ऊपास
कालची संध्याकाळ.गर्दीनं फुललेला रस्ता.सेलफोनवर बोलताना भान हरपलेली एक मुलगी.चालता चालता 'चुकून' एका छोट्याला धडकते.
मी ओळखतो त्या छोट्याला.गणपती मंदिरापाशी त्याची आई भाजी मांडून बसते.शाळेतून आला की छोट्या आईला मदत करतो. तर काय सांगत होतो ?
ती मुलगी धडकली आणि...
बेदरकारपणे तशीच पुढे निघून गेली.आमच्या छोट्याच्या हातातली,अर्धा किलोची साबुदाण्याची पिशवी फस्सकन् जमिनीवर सांडली..छोट्या काहीच करू शकला नाही. भरीर भर म्हणून दोन चार गाड्या बेदरकारपणे तो साबुदाणा चिरडून पुढं निघून गेल्या.साबुदाणा गोळा करण्याच्या पलीकडे पोचलेला. दाने दाने पें लिखा है.... कसचं काय ?अवघड आहे.
छोट्या तसाच सुन्न ऊभा होता.डोळ्यात पाणी.
'आई काय म्हणेल ?खरंच मुद्दाम नाही केलं मी...'
स्वतःची समजूत घालताना छोट्या रडकुंडीला.छोट्याला काय करावं सुचेना. एवढ्यात मागनं पक्यादादा येतो. पक्यादादा बालाजी किराणामधे डिलीवरी बाॅयचं काम करतो. पट्दिशी तो त्याच्या डिलीवरीवाल्या मोठ्या पिशवीतून साबुदाण्याची पिशवी काढून छोट्याला देतो. छोट्याच्या पाठीवर थोपटतो.
"कुणाला सांगू नकोस.अगदी आईलाही.."
सायकलवर टांग मारून तो ऊलटा दुकानाच्या दिशेने.तो दुकानात शिरतो.
"शेट आधा किलो साबुदाणा. मेरे पगारसे काट लेना."
मी हा सगळा पिक्चर मॅडसारखा बघत रस्त्यावर ऊभा असतो. मीही घाईघाईनं शेजारच्या बालाजी किराणामधे शिरतो. दुकानातून घाईघाईनं बाहेर पडणारा पक्या दिसतो.जुनी ओळख असल्यासारखा प्रसन्न हसतो.
"शेट अर्धा किलो साबुदाणा द्या." पैसे देवून, साबुदाणा न घेताच मी बाहेर पडतो.पक्यादादाचा हिशोब क्लिअर करून.
एरवी चतुर्थीचा ऊपास, साबुदाण्याच्या खिचडीच्या प्रेमाखातर करतो. आज मात्र तो साबुदाणाच पावला.
'मदत करण्याची ईच्छा हवी. त्याला ऐपत लागत नाही.'
काल पक्यादादानं सहज शिकवलं. हावरटासारखं अर्धा किलो पुण्या स्वतःच्या खात्यावर जमा करावसं वाटलं...
काॅपी पेस्ट केल्यासारखं.
बाप्पांची कृपा. गणपतीबाप्पा मोरया !
......कौस्तुभ केळकर नगरवाला.