दृष्टी
सध्या मी 'केळकर डायेट' फाॅलो करतोय..
सध्या तरी मी एकटाच फाॅलोअर आहे त्याचा.
रोज सकाळी अडीच किलोमीटर चालायचं.
संध्याकाळी पाच किलोमीटर सायकल दामटायची.
ईटस् वर्कींग.
महिनाभरात चार किलो वजन झपाट्यानं कमी झालंय.
जगाची माझ्याकडे बघायची दृष्टी बदलतीये.
चालायचंच..
माझा माॅर्नींग वाॅक सकाळी साडेनऊ ते सव्वादहा वाजेपर्यंत असतो.
अंदाज अपना अपना.
रोज सकाळी पावणेदहा वाजता.
मी गणपती चौकात असतो.
आयुर्वेद रसशाळेच्या कोपर्यावर एक कपल ऊभं असतं.
गेला महिनाभर बघतोय मी दोघांना.
जगातलं सगळ्यात रोमांटी कपल आहे ते.
विशी बाविशीतली असतील दोघं.
मुलगी काळीसावळीशीच.
स्मार्ट आणि हसरी.
मुलगाही तसाच.
दोघंही लुक्केसुक्केच.
फुंकर मारली तरी ऊडून जातील दोघं.
दोघं कुठल्या तरी साडीच्या नाहीतर ज्वेलरीच्या दुकानात काम करीत असावेत.
बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणी.
दोघांचे युनिफाॅर्म्स वेगवेगळे.
कामाला जायच्या आधी पंधरावीस मिनटं भेटत असावेत.
वेगळ्याच विश्वात वावरायची दोघं.
बंद दुकानाच्या कट्ट्यावर ऊभी असतात दोघं.
नयनों में सपना , सपनोंमें सजना..
नुसत्या डोळ्यांनी बोलायची दोघं.
शब्दांची गरजच नसावी.
मधेच खुदकन् हसायची दोघं.
दोघांच्या डोळ्यांत ऊद्याची स्वप्नं.
ती पुरं करण्याचा विश्वासही.
रोज बघतोय मी त्यांना.
कुठेही व्हल्गरपणा नाही.
चीपपणा नाही.
अंगचटीला जाणं नाही.
पंधरावीस मिनटात त्यांची भेट संपायची.
जड पावलांनी निघून जायची दोघं.
वेगवेगळ्या दिशेनं.
सायलेंट डीसेंट प्रेमीकपळ.
त्या दोघांना बघितलं मला एकदम फ्रेश वाटायचं..
प्राॅब्लेम एकच होता...
म्हणजे मला वाटत होता.
त्याला जाड भिंगाचा चष्मा होता.
अगदी सोडावाॅटर.
साॅरी ...
चुकलो.
मला आठवतंय पहिलीत आमच्या वर्गात एक मुलगा होता.
त्यालाही असाच जाडभिंगाचा चष्मा होता.
आम्ही त्याला सोडावाॅटर म्हणून चिडवायचो.
बाबांनी कधीतरी हे ऐकलं..
मला फोडून काढला होता बाबांनी.
'आधी देवापुढं ऊभा रहा.
आभार मान देवाचे ज्यानं तुला चांगली दृष्टी दिलीय.
तुझ्या त्या मित्राला चांगली दृष्टी मिळो असं सांग देवाला..'
तर काय सांगत होतो ?
या मुलीनं काय बघितलं त्याच्यात.. ?
माझ्याकडं ती दृष्टीच नव्हती.
तिच्यासाठी जगातला सगळ्यात सुंदर मुलगा होता तो.
स्वभावानं, वागणुकीनं खरंच असावा तसा तो.
कालची गोष्ट.
चतुर्थी होती.
मी गणपती चौकात पोचलो रोजच्या वेळी.
ती दोघं दिसली नाहीत.
मला चुकल्यासारखं वाटलं.
पुढं गणपतीचौकातल्या बाप्पापाशी पोचलो.
हात जोडून ऊभा होतो.
सहज शेजारी बघितलं.
शेजारी ती मुलगी ऊभी .
भरल्या डोळ्यांनी ती बाप्पाला विनवीत होती.
मला रहावलंच नाही.
मी पटकन् विचारलं.
"तो कुठंय ?"
ती जरा अवघडली.
धीर एकवटून म्हणाली.
"आज त्याच्या डोळ्यांचं आॅपरेशन आहे.
नंबर कमी करण्याचं, लेसरवालं.
सहा महिने ओव्हरटाईम करून पैसे जमवतोय तो.
माझं ऐकतच नव्हता.
मी तुला शोभून दिसायला हवा असं म्हणतोय.."
मला काय बोलावं कळेना.
"काळजी करू नकोस.
सगळं काही ठीक होईल."
मनातल्या मनात हजारवेळा त्याच्यासाठी बाप्पांना विनवलं..
खरं तर आॅपरेशनची गरज माझ्यासारख्यांना आहे.
त्याच्यासारख्यांकडे बघायचा चष्माच नाहीये आमच्याकडे.
जाता जाता एवढंच सांगेन.
ते जगातलं सगळ्यात सुंदर कपल कालही होतं..
आजंही आहे.
आणि ऊद्याही.
100%.
..............कौस्तुभ केळकर नगरवाला.