story

Kaustubh Kelkar

ब्रेकअप

"काय म्हणालास तू रात्री ढोसताना ?

'हिच्या तिसरी चौथीच्या मुलांच्या ट्यूशन्सच्या जीवावर घर चालतं का माझं ?

रोज रक्त आटवतोय बादलीभर..'

नको ते ऐकू आलं नेमकं कानावर.

सटकली होती माझी...

शिकवणं पॅशन होती रे माझी.

आई ,बाबा, मुलं....

तुझ्या एका शब्दाखातर शाळेतली नोकरी सोडली रे मी माझी.

ईमोशनली ब्लॅकमेल केलंस तू मला.

तुला सांगून काय ऊपयोग म्हणा ?

आर्यला थालपीठ हवं.

परीला आलूपराठा.

दूध दोघांनाही प्यायचं नसतं.

रोज स्कूलबसपर्यंत मॅरेथाॅन धावते मी.

दहा तर्हा सगळ्यांच्या.

तू तर ब्रेकफास्टच्यावेळी सुद्धा पेपरमधे डोकं खूपसून बसलेला असतोस.

पानात काय वाढलंय ?

तोंड भरून कौतुक सोडा, छान झालंय एवढं सुद्धा ऐकू आलं नाही कधी.

बाबांना दिवसातून चार वेळा माझ्या हातचाच चहा हवा.

आईंचे दुखरे गुडघे आणि सिरीयलचा रतीब.

दोघांची औषधं.

ती वेळेवर देणं माझीच जबाबदारी.

त्या दोघांच्या ते कधीच लक्षात रहात नाही.

मान्य रे...

दोघांची वयं झालीयेत.

माझं घर, माझी माणसं.

माझी जबाबदारी.

मी नाही म्हणत नाही रे..

गृहीत धरताय तुम्ही सगळे मला.

अरे मीही चाळीशीत आलेय आता..

त्यावर वरताण आपण.

संध्याकाळी आयत्यावेळी कळवता.

तिघाचौघांना घेऊन येता.

साग्रसंगीत सगळे कार्यक्रम.

किती वेळा सांगितलंय.

मुलं मोठी झालीयेत आता..

तूच दिवसेंदिवस लहान होत चाललायस..

तरी बरं घराला दोन मजले आहेत म्हणून बरं..

तुमची सरबराई करताना शंभरवेळा वरखाली मला करावं लागतं रे..

त्यात तुमची जीभ ही अशी घसरणार..

कंटाळा आलाय सगळ्याचा.

आय नीड ब्रेक.

ब्रेकअप म्हण हवं तर...

महिनाभरासाठी.

आई बाबांची महिनाभराची औषधं आणून ठेवलीयेत.

त्यांच्या कपाटावर प्रिंट आऊट लावलीय.

वेळ, गोळ्यांची नावं सगळी डिटेल्स आहेत....

सखूबाई ऊद्यापासून सकाळी सहा ते दहा येईल.

ब्रेकफास्ट, डबा, जेवण, सगळं करून जाईल.

किराणा भरून ठेवलाय.

आठवडाभराची भाजी आणून ठेवलीय.

पुढचं तुम्ही बघायचं.

सखूबाईला होमवर्कचा गायडन्स काही देता येणार नाही.

पोरांना सांग.

आपलं आपण ऊठायचं.

आवरून स्टाॅपवर जायचं.

जमलं तर बघा नाहीतर बुडवा शाळा.

आपण तर स्वयंभू आहात.

कंपनीला कॅन्टीन आहे.

स्विगी आहे , झोमॅटो आहे.

कुणाचं कुणावाचून काहीही अडत नाही.

माझ्यावाचून तर कुणाचंच नाही.

आईबाबांना साॅरी सांग.

सो बेस्ट लक...

साडेआठची फ्लाईट आहे.

मी साडेपाचलाच निघालीये.

गोव्याला जातेय.

महिनाभराचा मेडिटेशन कॅम्प आहे.

अॅडमिनचा नं. देतेय.

सेल अलाऊड नाहीये.

ईमर्जन्सी असेल तरच फोन करा..

मला निरोप मिळेल.

बाय...

स्पष्टच बोलतेय.

असं समज.

महिनाभरासाठी बायको मेलीये.."

सकाळी पावणेसहाला विनय चुळबूळत ऊठला.

स्वयपाकघरातली शांतता अंगावर आली.

सवयीनं सेलफोन बघणं झालं.

नेहाचा हा वाॅटस्सप मेसेज...

"साॅरी..

मनापासून.

दिलसे.

तू काळजी करू नकोस.

वुई विल मॅनेज.

यू डिझर्व्ह ए ब्रेक.

हॅपी जर्नी"

घर जागं झालं.

खरंच 'जाग'आली.

आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येक जण रेडी.

सखुबाईच्या हातचा नाश्ता विनातक्रार पोटात..

आर्य,परी,विनय वेळेच्या आधी रेडी.

घर सोडायच्या तयारीत..

आभाळात प्लेनचा घुर्र आवाज..

विनयनं घड्याळ बघितलं.

साडेआठ.

गोवेकर निघाले...

टिंगटाँग.

बेल वाजली.

दारात नेहा ऊभी.

"शेवटच्या क्षणी मागे फिरले...

ब्रेक हवाय रे..

पण आपल्या लोकांबरोबर"

सगळ्यांनी दिलसे साॅरी म्हणलं.

पॅकअप..

विनयनं सांगितलं.

"अर्ध्या तसात सगळे रेडी व्हा.

आपण महाबळेश्वरला जातोय.

दोन दिवस सगळं विसरून जायचं.

जस्ट चिल..

सकाळी सहावाजताच मी रिसाॅर्टमधे बुकींग कन्फर्म केलंय.

काहीही झालं तरी मी माझ्या बायकोला ओळखतो."

नेहा खुदकन् हसली.

टेडा है पर मेरा है !

चलता है...

ब्रेक अप तो बनता है !


............कौस्तुभ केळकर नगरवाला.