मातारानी...
"मातारानी...."
दोघांनी एकमेकांना हार घातले.
पेढ्याचा घास भरवला.
विटनेसच्या सह्या झाल्या.
झालं लग्न...
सनई नाही की, बॅन्डबाजा नाही.
वरमाई म्हणून 'मिरव'णूक नाही.
सरिताचं पिक्चर " कभी खुषी कभी गम " सारखं.
लेकाचं लग्न म्हणून पंधरा दिवस रजा टाकलेली.
आणि इथं एका दिवसात लग्नोत्सव संपला सुद्धा.
अर्थात काव्या छानच होती.
नम्र आणि संस्कारी.
पण अॅटिट्युडवाली.
मंदारनं मागणी घातली ,तेव्हाच अट घातली होती.
लग्न रजिस्टर्डच होणार...
कळलं ???
कळलं हो कळलं...
तसं खरं तर, 'शाब्बास सुनबाई'च म्हणायला हवं होतं सरितानं.
कमर्शियल आर्टिस्ट होती ती.
स्वतःची एक अॅडव्हरटायझिंग फर्म चालवायची.
हाताखाली दहा लोकं काम करायची तिच्या.
हिच्याशी कसं जमणार आपलं ?
सरिताच्या आॅफिसगँगनं पाठवलेला मेसेज, आठवला तिला..
दोनच शब्द.
" बेस्ट लक सरिता"
बघू यात.
नाहीतर मंदारला म्हणेन, तू आपला वेगळा रहा बाबा.
सरिताला हा विचार करून बरं वाटू लागलं..
कोर्टातून मंडळी जेजूरीला गेली.
खंडेरायाचं दर्शन घेतलं अन्..
रात्रीच्या फ्लाईटनं ती दोघं सिंगापूरला, ऊडन छू...
जाताना काव्या सांगून गेली.
'रजा बिलकूल कॅन्सल करू नका., मी येतेच आहे चार दिवसात.'
खरं तर सरिताला मनापासून वाटत होतं , सरळ जाॅईन व्हावं.
काय करणार घरी बसून.?
पग ऊगा कशाला त्या नव्या पोरीला दुखवा ?
सरिता घरातली दुष्काळी कामं काढत, दिवस ढकलत बसली.
पाचव्या दिवशी सकाळच्या फ्लाईटनं दोघं परत.
नव्या नवरीचं तेज दिसत होतं काव्याच्या चेहर्यावर..
फार 'तेज' निघाली नाही म्हणजे मिळवलं.
काव्यानं एक बॅग रिकामी केली.
दुसरी तयारच होती.
म्हणाली , 'आई चार दिवसांची बॅग भरून तयार रहा. उद्या सकाळी आपल्याला भुर्रऽऽऽ ऊडायचंय"
.......
हातात गरमागरम "कावा" चहाचा कप धरून सरिता काचेतून समोरचं दृश्य बघत होती.
लांबवर पसरलेलं दाललेक.
त्यात डोकावून मेकअप करणारे, हुडहुडी बर्फाचे डोंगर.
सरिता बाहेर आली.
"ड्रीम हाऊस"
त्यांच्या हाऊसबोटीचं नाव.
राजेशाही थाट.
अदबशीर, घरंदाज, युसूफ महंमद.
हाऊसबोटीचा केअरटेकर.
काव्या अशी कसं काय वागू शकते ?
सरिताचा विश्वासच बसत नव्हता.
सिंगापूरहून आल्याच्या दुसर्याच दिवशी, त्या दोघींनी श्रीनगरची फ्लाईट पकडलेली.
ईथलं चार दिवसाचं बुकींग होतं.
दोघींची धमाल चालली होती.
अंगणात बसल्यासारखं, हाऊसबोटीच्या व्हरांड्यात बसायच्या.
शिकार्यातनं शाॅपीग माॅल वहात वहात, दारी यायचं.
भरमसाठ खरेदी.
टॅक्सी बूक केलेलीच होती.
शालीमार गार्डन झालं.
निशान गार्डन झालं.
काश्मीरी ड्रेसमधे फोटूसेशन झालं.
सरिताचं आंधीवाल्या शालगुंडाळी संजीवकुमारला, आठवून झालं.
रूषी पकूरचा रफूचक्कर आठवून झाला.
हाशहुश करत दोघी शंकराचार्य टेकडी चढल्या.
लालचौकात शाॅपींग करून झालं.
डबी डबी केशर खरेदी करून झालं.
दोघीही 'काश्मीर की कली' असल्यासारख्या ऊधळल्या होत्या.
एक दिवस दोघांनी महंमदचं किचनही शेअर केलं.
सास्वासुनांच्या भिंती कधीच गळून पडल्या होत्या.
शेवटच्या दिवशी चारचिनार.
जीन्सवाल्या सास्वासूना अल्लड मैत्रिणी वाटत होत्या.
त्यांच्या रिलेशनला चारचाँद लावले चारचिनारने.
रोज रात्री मनसोक्त गप्पा व्हायच्या.
काव्यानं सांगितलंच होत.
" सिर्फ खुद के बारे में बोलने का !
बाकी दुनिया डूबा दो दाल लेक में"
एकमेंकाचे स्वभाव कळले.
आवडीनिवडी कळल्या.
स्टेन्ग्थ अन् वीकनेसही.
आता माझी सटकली..
कशामुळे सटकते वो भी समझ में आया.
चार दिवस चार सेंकदासारखे संपले.
परत येताना फ्लाईटमध्ये काव्या 'मन की बात' कहने लगी.
"आई , वेगळ राहणं ...कभ्भी नही..
मंदूबाळाला ओळखलंय मी.
तो काय अन् मी काय ?
आईशिवाय रहाणं नकोय मला.
आता एकत्र राहचंय तर एकमेकांना स्पेस द्यायला हवी.
अॅडजस्टमेंट आली.
मी हाॅस्टेलवर रहायची, तेव्हा पहिल्यांदा माझी रूम पार्टनर आखडू वाटलेली.
चार दिवस एकत्र राहिलो.
ओळख पटली.
रूम नाही सगळं जग शेअर केलं चार वर्ष.
तसंच ईथे..
आपण दोघी आता एकमेकांना ओळखून आहोत.
कोण कधी कसं वागेल, याचा अंदाज आलाय.
सोऽऽ मिळून आपण दोघी..
ये कश्मीर घर ऊठा लेके जा रहे है !
घराचा स्वर्ग करून टाकू."
आणि..
" त्या दोघा येडबंबूंना आपले सेवक."
सरिता पंच मारून खिदळली.
मुंबई आली, तेव्हा सरिता काव्याच्या कुशीत शिरून बिनघोर घोरत होती..
लाईफ पुन्हा सुरू झालं.
पर थोडा हटके..
सक्काळी सक्काळी काव्या सरिताच्या "ए आई" म्हणून गळ्यात पडते.
आज तुमचं भरलं वांगं होने दो !...
संध्याकाळी सरिताचा हुक्म.
एऽऽ के , तुम्हारा चिज पिज्जा बनाव....
काश्मीर गेलं चुलीत .
खरा स्वर्ग ईथंच आहे..
घरच्या घरी.
मातारानी प्रसन्न.!
(पुनःप्रक्षेपित)
........कौस्तुभ केळकर नगरवाला.