मधुशाला
"पशा,
असशील तसा निघून ये.
निधी बारला जायचंय...
मी वाट बघतोय.
रघुही पोचतोय."
संज्याचा फोन.
पशा नुकताच आॅफीसातून घरी टेकलेला.
पशाला याची सवय होती.
दीड महिन्यातून एकदा.
असं हातघाईचं बोलावणं यायचं.
नाही म्हणताच यायचं नाही.
पशा , संज्या आणि रघु.
तिघे बचपन के साथी.
सख्खे मित्र.
एकमेकांपासून काहीही लपवलं नव्हतं..
अगदी काहीही.
तसे तिघं आता पन्नाशीला पोचलेले.
पोरं काॅलेजात.
संज्याला एकच पोरगी.
ती तिकडे अहमदाबादला.
आर्किटेक्चर करत्येय.
पशाचा मुलगा ईन्जिनिअरींगला इथेच पुण्यात.
लास्ट ईयरला.
रघुचं लग्न जरा ऊशीरा झालेलं.
त्याचा मुलगा अजून ईलेवन्थलाच.
तिघंही कुलकर्णी चौकातल्या देशपांड्यासारखे.
टिपीकल मिडलक्लास.
टु बीएचकेचे हफ्ते भरताना पिकलेले.
सदैव हाताची घडी तोंडावर बोट.
फारसा हात सैल सोडता यायचा नाही.
तरीही...
दीड महिन्यातून एकदा.
एकदा बसायचेच.
गेली अनेक वर्ष.
निधी बारचा मालक.
त्यांच्या घट्ट ओळखीचा.
तिघांनाही निवांत बसू द्यायचा.
पीना पिलाना हा तर निव्वळ बहाना.
मस्त गप्पा व्हायच्या..
पशाची परिस्थिती तिघांत जरा बेताची.
तरीही समाधानी.
दहा वर्ष झालीयेत.
पशा ईथे नुसताच बसतो.
आवराआवर झाल्यावर दोघांना सुखरूप घरी पोचवतो.
आंघोळ करताना रेनकोट घातल्यासारखा,
कोरडाठाक राहतो...
'का रे बाबा ?'
संज्या , रघुनं किती वेळा आग्रह केला असेल.
'पाहिजे तर आम्ही बिल भरतो...'
नाय नो नेव्हर.
पशा ऊवाच.
"पोरगं मोठं होत चाललंय.
खर्च वाढणार.
प्रश्न परवडण्याचा नाही.
तत्वाचा आहे.
आता फोकस त्याच्या करिअरवर करायचाय.
तिथं मी कुठेही कमी पडता कामा नये.
पैशाला आणि कष्टालाही.
तब्येत सांभाळून रहायला हवं.
माझ्याकडे बोट दाखवण्याची संधी मी देणार नाही त्याला.
पिणार...
दारूनं आंघोळ करेन.
आत्ता नाही.
तेव्हा..
पोरगं नोकरीला लागलं की मी पार्टी देईन.
वाट बघतोय त्या दिवसाची.
तोवर नाही.
तब तक टाईमप्लीज.
सगळ्या मोहांपासून दूर..
तुमच्याबरोबर येईन.
फक्त जेवायला.
बिल टीटी एमएम.
मला आग्रह करू नका.
तुमचं चालू द्या."
मान गये बाप.
पशा ग्रेटच आहे.
एकदम पक्का.
तर काय सांगत होतो ?
आज एकदम अचानक ?
खरं तर आज मुहूर्त नाहीये.
अजून दीड महिना संपायला अवकाश आहे.
मग कसं काय ?
पशा निधी बारपाशी पोचतो.
दारातच रघु आणि संज्या.
अस्वस्थ आत्म्यासारखे घिरट्या घालतायेत.
'पशा,
नीट ऐक.
डोक्यात राख घालून घेऊ नकोस..
आत्ता अर्ध्या तासापूर्वी मालकाचा फोन आला होता.
'प्रशांतसाबका बेटा आया है बार में.,
दोस्तोंके साथ !'
तुला वाईट वाटायला नको म्हणून,
मालकानं आम्हाला कळवलं.
तू ईथेच थांब.
आम्ही आत जातो.
त्याला नीट समजावतो.
आणि त्याला बाहेर घेऊन येतो..'
संज्या ऊवाच.
पशाला खो देवून दोघं आतमध्ये.
ईथे बाहेर पशा नखं कुरतडतोय.
कुतरओढ.
धूसफुस..
कशासाठी रक्त आटवलं ईतके दिवस..?
यासाठी ?
लाज आणलीन् पोरानं..
तरीही..
पन्नास टक्के पोराविषयी खात्री वाटत होती.
मेरा बेटा है वो !
असं नाही वागणार..
पंधरा मिनटात दोघं बाहैर.
"चल.
तसं काही नाहीये.
चुकीची माहिती मिळाली होती."
तिघंही सारसबागेच्या दिशेने.
वाटेत चितळ्यांकडे थांबले.
अर्धा किलो केशरी पेढे.
दोघांनी बाप्पाला नैवेद्य दाखवला.
तिघांनी मनापासून दर्शन घेतलं.
बाहेर येवून पशाला पेढा भरवला.
पशाला कडकडून मिठ्या मारल्या.
" काय झालंय ?"
रघुवाणी ऐकू आली.
'पशा...
नशीबवान आहेस तू.
पोरगं गुणाचं आहे तुझं.
आम्ही आत गेलो.
तो तिथेच होता.
मित्रांबरोबर.
तिघं जण.
आजच टीसीएसचं आॅफर लेटर मिळालंय त्याला.
तगडं पॅकेज आहे.
घरी आल्यावर तुला सरप्राईज देणार होता.
म्हणून बोलला नव्हता कुणाशी.
काय सांगत होतो ?
सेलीब्रेट करायला आले होते तिघं.
ऊरलेली दोघं वाळवंटातून आल्यासारखे तहानलेली.
लीटरमधे ढोसत होती.
आम्ही एकदम टेबलापाशी.
तुझाच पोरगा तो.
कोरडाठाक.
कुठंही अपराधीपणा नाही चेहर्यावर.
मनापासून हसला.
' वाॅट ए सरप्राईझ !
ग्रेट.
काकालोग क्या पिओगे ?'
गुड न्यूज दिली.
आम्ही काॅग्रॅटस् दिले.
" तू नाही पीता ?"
आज नाही.
बाबाबरोबर पिईन.
पहिल्या पगाराच्या दिवशी.
आॅफकोर्स तुम्हाला बोलावणारच..
आज या दोघांना सुखरूप घरी पोचवायचंय.
हाॅस्टेलाईट आहेत.
ओला करून देईन त्यांना.
" बढिया..
पुढचं काय ?"
'बाबाचं माहित नाही.
मी मात्र आईला कधीच सांगितलंय.
"पिईन तर माझ्या पैशानं.
बाबाच्या पैशानं नाही."
आता काय वाटतंय सांगू ?
बाबाबरोबरची पार्टी झाली की जरा ब्रेक घेईन.
पुढची पार्टी एकदम पंचवीस वर्षांनी.
माझा पोरगा नोकरीला लागला की.
काकालोग,
बाबाची काॅपी मारायला जाम मजा येते.
वो मजा जाम में नही !
ते जाऊ दे.
तुम्हाला काय मागवू ?'
पशा,
पोरगा बापआदमी आहे तुझा.
खूप आनंद झाला.
अभिमान वाटतोय त्याचा.
" चालू दे तुमचं "
असं म्हणून बाहेर पडलो.
बाप्पाकडे आल्यावर छान वाटलं.
पहिल्यांदा दारूशिवायची नशा अनुभवतोय.
मजा आली.
चिअर्स पशा !'
पशा, संज्या आणि रघु.
तिघांनीही दिलसे चिअर्स केलं.
मनातल्या मनात.
मनातली मधुशाला रंगीन झालेली.
जगण्याची नशा टाॅपला.
आनंदाचे जामवर जाम रिचवत तिघं घरी निघाले.
एवढ्यात पशाचा फोन वाजला.
"पापा केहते है, बडा नाम करेगा..."
पशाची रिंगटोन,
समाधानाचा शेवटचा पेग जड करून गेली.
नशेमन, जानेमन ,
मस्त रहो, खुश रहो !
......कौस्तुभ केळकर नगरवाला.