सीमोल्लंघन
मी लहान असतानाची गोष्ट. बोल्ले तो लाॅकडाऊनच्या आधीची गोष्ट. लाॅकडाऊननंतर मी स्वतःला अकाली प्रौढ वगैरे समजायला लागलोय.तर काय सांगत होतो ? लाॅकडाऊनपूर्वी मुंबईला पाच सहा वेळा कथाकथनाच्या कार्यक्रमाचा योग जुळून आलेला.नंतर ? काय ते समजून घ्या. दर वेळी दुपारी जेवण करून पुण्याहून निघायचो. पाच सहा पर्यंत मुंबईला पोचायचं. सात वाजता कार्यक्रम सुरू करायचा. साडेआठ नऊपर्यंत संपून जायचा. मुंबईची लोक सहनशील खरी. माझं कथाकथन ऐकून त्यांची सहनशीलता अजून वाढायची. आणि माझा निर्लज्जपणा...असो. मग जेवण झालं की साडेदहा अकराला मुंबईहून निघायचं. रात्री अडीच तीनपर्यंत पुण्याला पोचायचो.
पुणे स्टेशन एस्टी स्टॅन्डला ऊतरलो की बाहेर पडायचं. बाहेर ईन्फायनाईट रिक्षावाले ऊभे असायचे. त्यातले निम्मे यूपी बिहारवाले. रात्री अडीच तीन वाजताही तोंड पानानं रंगलेलं. त्यातून नारायण पेठ म्हणलं की त्यांचा मूडच जायचा.त्यांना कोथरूड,सनसिटी, येरवडा, खराडी वगैरे लांबचं भाडं हवं असायचं.
"कहा आया ये नारायन पेट ?"
असं विचारायचे. त्यांच्या रिक्षाच्या मीटरनं कधीच मान टाकलेली असायची. काय वाट्टेल ते भाडं सांगायचे. दीडशे, दोनशे,अडीचशे.वैताग यायचा. असंच एकदा रिक्षाची वाट बघत होतो.एक पांढर्या हूडवाली रिक्षा आली. स्वच्छ. चकचकीत पुसलेली. रिक्षात ज्ञानेश्वरांची छोटी तसबीर. हार घातलेला. ऊदबत्ती लावलेली. हलक्या आवाजात विठ्ठलनामाचा टाहो. कडकडे गात होते. माऊलींशी ही माझी पहिली भेट. खाकी युनिफाॅर्म. डोक्यावर पांढरी टोपी. गळ्यात माळ. पांढरे केस. काळ्या फ्रेमचा चष्मा. चेहर्यावर प्रसन्न हसू.
"बोला मालक, कुठं जाणार ?"
माऊलींनी विचारलं.
मी म्हणलं, "नारायण पेठेत. केसरीवाड्यापाशी."
"चला की मग. या बसा..."
जीभ रेटेना. नगरची सवय.रिक्षात बसायच्या आधी भाव करायचा. मी चाचरत विचारलं.
"किती घेणार ?"
माऊली मनापासून हसले.
"मीटरप्रमाणे होतील तेवढे द्या..."
मी पटकन् रिक्षात बसलो.सोमवार, रविवार,रास्ता पेठेतून रिक्षा चाललेली. रस्ता रिकामा. मस्त गप्पा झाल्या. जुन्या पुण्याच्या खाणाखुणा.नवीन माहिती. मस्त ट्युनिंग जमलं.
"चाळीस वर्ष झालीयेत रिक्षा चालवतोय. दोन्ही पोरं शिकली. नोकरीला लागली. लेकीचा संसार वेवस्थित सुरू हाये. बायकू ओरडते. बास झालं म्हणते. पासष्ट वय आहे माझं. नाही करमत. हात पाय चालू रहायला हवेत साहेब. दिवसा लई ट्राफीक असतो. जीव कावतो.मंग मीच ठरवलं. रात्री रिक्षा चालवायची.रात्री दोन ते सकाळी सात.हे बाहेरचे रिक्षावालं लुटतात गरिबाला. अव्वाच्या सव्वा भाडं मागत्यात. चांगल्या लोकान्ला घरी पोचवायचं अन् दुवा घेयाची. पैशापेक्शा समाधानानं शिरमंत होतो मानूस.."
पटलं. एकदम पटलं.
"माझं नाव संपत. सगळे माऊली म्हणतात मला.भाडं घेतलं की बाहेरच्या चहावाल्याला सांगून जातो., कुठं चाललोय ते. तो दोस्त आहे आपला."
माऊली पटलाच एकदम. स्वतःच्या धंद्याशी प्रामाणिक राहणारा. तत्ववादी.
पुढच्यावेळी असाच तीन वाजता पुण्याला पोचलो. बाहेरच्या टपरीवाल्याकडे चौकशी केली.
"माऊली होय ? येईलच ईतक्यात. मंडईचं भाडं घेवून गेलाय. तुमी चहा पिवा तोवर."
चहा संपेपर्यंत माऊली आलेच. ओळख पटली.
"केसरीवाड्यापाशी जायाचं ना ?"
मी हो म्हणलं. रिक्षा सुरू झाली.
"मालक, थोडा वेळ घेऊ का तुमचा ? मस्त पोहे खाऊ यात. भूक लागली म्हणून नाही, चांगली चव माहीत पडावी म्हणून..."
गिर्हाईकाला मालक म्हणायची माऊलीची जुनी सवय.
"चालेल की". मी आनंदानं म्हणलं.
पहाटे साडेतीन वाजता केईएम समोरच्या गल्लीत पोहे खाल्लेत आम्ही. अजूनही चव जीभेवर रेंगाळतेय. जगात भारी. अगदी खरं सांगतोय. पुन्हा पोह्याचे पैसे माऊलीनेच दिले.रिक्षाभाडं जेवढं मीटर दाखवेल तेवढं. दीडपट वगैरे बिलकूल नाही.
पुढच्या वेळी माऊलीला म्हणलं.
'"माऊली आज काय खायला घालणार ? अट एकच. पैसे मी देणार."
माऊली हसले फक्त. पहाटे पावणेचार वाजता मंडईपाशीची झटका मिसळ. पुढच्या ट्रीपला दारूवाला पुलापासचा बासुंदी चहा. मी दरवेळी पैसे द्यायचा प्रयत्न
करायचो.ऊपयोग व्हायचा नाही.ही सगळी माऊलीची दोस्त मंडळी. माझ्याकडनं पैसे घ्यायची नाहीत.
एकदा पुण्याला पोचायला ऊशीर झालेला.घाटात जॅम लागलेला.पावणेपाच वाजलेले.स्टॅन्डबाहेर आलो अन् समोर माऊली. जाम दमलेलो. दहा मिनटात तडक घरी.
माऊलीला म्हणलं.
"या वरती. बायको छान चहा करते माझी."
माऊली हसले.
" त्या माऊलीला कशाला तरास..? रामपारी डोक्यात लई घणघण असते कामाची. अवचित पाहुना नको या टायमाला. तुम्ही दोस्त आहात आपले. पुन्हा योग येईलच कवातरी. तोवर मोहात नाही गुंतायचं..."
तो एक दिवस आणि आजचा दिवस. माऊली मला पुन्हा भेटलेले नाहीत. मधल्या काळात अनेक युगं ऊलटून गेली असावीत. आजची संध्याकाळ.नदीकाठी अष्टभुजा देवीचं दर्शन घेतलं.आपट्यांची पानं घेऊन सीमोल्लंघनाच्या तयारीनं देवळाबाहेर आलो. अचानक समोर माऊली दिसले. रिक्षा चालवत होते.मागे लोक बसलेले. मला प्रचंड आनंद झालेला.
"माऊली"
मी जीव खावून हाक मारली.
माऊलींनी रिक्षा थांबवली. चेहर्यावर आनंदाचा धबधबा.
"मालक. बरं झालं भेटलात.आज माझा शेवटचा दिवस. बेचाळीस वर्सांपूर्वी दसर्याच्या दिवशीच रिक्षा चालवायला सुरवात केल्ती. मागच्या मैन्यात डोळं दुखाया लागले. चेक केलं तवा मैत पडलं, मोतीबिंदू पिकतोय डाव्या डोळ्यात. मंग म्हनलं. बास झालं.आता रिटायरमेंट. फुलस्टाप. मागं भैन आन् भाचा हाईत. तो चालविनार माझी गाडी ऊद्यापास्नं...."
माऊलीच्या डोळ्यात पाणी साचलेलं.एकदम काय झालं कुणास ठाऊक. माऊलींनी मागच्या लोकांना खाली ऊतरवलं. मी , बायको,लेक तिघं मागे बसलो. ओंकारेश्वरापर्यंत चक्कर मारून आलो.खरं सीमोल्लंघन. निरोप घेताना माऊली म्हणाले.
"मालक, तुम्ही आलात अन् माझा शेंडआफ भारी झाला."
मला काय बोलावं सुचेना.आम्ही तिघांनी माऊलींना आपट्याची पानं दिली. वाकून नमस्कार केला.
मागे वळून न बघता रिक्षा निघून गेली.माझी नजर हातातल्या ऊरलेल्या आपट्यांच्या पानांकडे गेली...
खर्या सोन्याची पानं ओंजळीत चकाकत होती.
माऊली... माऊली !
............कौस्तुभ केळकर नगरवाला.