हॅप्पी नवरोझ
"हॅप्पी नवरोझ"
घनश्याम.
घनश्याम कुलकर्णी.
माझ्याच वर्गात होता.
पाचवी ब.
न्यू ईंग्लीश स्कूल.
त्याच्या बाबांची मोठ्ठी बेकरी होती.
तिकडे कॅम्पात.
एकदम फेमस.
केक,टोस्ट,खारी,क्रीमरोल,नानखटाई, पाव, ब्रेड,बनमस्का..
पेस्ट्री हे प्रकरण फक्त ईथेच मिळायचं तेव्हा.
काळं कुळकुळीत नक्षीदार फर्निचर.
बहुधा सागवानी नाहीतर शिसमचं असावं.
ऊंच काचेची कपाटं.
काळा नक्षीदार काऊंटर.
त्याच्यावर पांढरं शुभ्र संगमरवर.
काऊंटरवरच्या भल्यामोठ्या काचेच्या बरण्या.
त्यातून डोकावणारे वेगवेगळ्या रंगाचे, फ्लेवरचे केक्स.
पावाचा गरम ताजा वास.
भिंतीवर काळ्या प्रेम्सच्या धूसर तसबिरी.
तसबिरीत जाऊन बसलेले कुठले तरी पारसी बावाजी.
सगळं टिपीकल पारशी वातावरण.
काऊंटरमागे काळ्या ऊंच सागवानी स्टुलावर बसलेले,
घनश्यामचे बाबा.
मस्त गुजराती पारशी बोलायचे.
डोक्यावर तशीच काळी चकचकीत गोल टोपी घालायचे.
एखादवेळी घना आम्हा दोस्तांना बेकरीत घेऊन जायचा.
बहुतेक त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी.
काचेच्या बेलबुट्टीदार नाजूक नक्षीच्या,
किणकिणणार्या डिशेस.
त्यात मांडलेल्या केकच्या स्लाईस.
केकचा रंग, केकचा वास आणि त्यावरचं क्रीम.
नुसतं बघूनच पोट भरून जायचं.
जिभेला पाणी सुटायचं.
कहानी में ट्विस्ट.
एकदम आयुष्यभराचं ऊपाशी असल्याचं वाटू लागायचं.
"डिशमधला केक कधी संपूच नये..
आणि घनाचा वाढदिवस वर्षातनं,
निदान चारदा तरी यावा.."
मी मनोमन बाप्पाला दिलसे विनवायचो.
खरं सांगू ?
आयुष्यात नंतर खूप वेळा, खूप केक्स खाल्ल्या.
घनाच्या बेकरीतल्या केकचं अप्रूप अजूनही तेवढंच ताजंय.
घनाचं घर.
घर कसलं मोठ्ठी हवेली होती ती.
दोन मजली.
टुमदार.
कौलारू.
जाळीदार नक्षीची लांबलचक गॅलरी.
मोठ्ठा व्हरांडा.
गोल वळणा वळणाचा जिना.
मोठ्ठा कुरकुरे झोपाळा...
घनाच्या घरावरनं किती तरी वेळा सायकल हाणत जायचो.
खूप वाटायचं, आत डोकवावं.
हिंमत नाही व्हायची.
भिती वाटायची खूप.
घनाच्या घरात पारसी बावाचं भूत रहायचं म्हणे..
घनाला विचारलं तर तोही 'होऽऽ' असं म्हणायचा.
'मी नाही घाबरत त्याला' असंही म्हणायचा.
मला तर घनाचीही भिती वाटायला लागलेली.
घनाचं घर कम हवेली, घनाच्या बाबांची बेकरी.
आठवणींच्या अल्बमला घट्ट चिकटलेली पानं.
गूढ, अगम्य आणि थोडसं भितीदायक.
आज किती तरी दिवसांनी, बहुतेक वर्षांनी.
ईथं येणं झालं.
दहावी झाली आणि आम्ही बडोद्याला शिफ्ट झालो.
नंतर ईथे कधी आलेलोच नाही.
कॅम्पात आलो आणि एकदम घनाची आठवण झाली.
घनाच्या बाबांची बेकरी ?
काय बरं नाव होतं बेकरीचं ?
आठवलं.
'नवरोझ बेकर्स'
नक्की जागा आठवेना.
सहज चौकशी केली.
"ही काय ईथे कोपर्यावरच आहे"
कुणीतरी सांगितलं.
मस्त डेकोरेशन केलेलं.
कॅन्डल्स, फुगे.
पारशी न्यू ईयरचं साधसं सेलीब्रेशन.
खरं तर बेकरीचं नावच नवरोझ.
म्हणजे हॅपी न्यू ईयरच की.
निवडक पारशी मंडळी.
बरीचशी ऊच्चभ्रू, शालीन, खानदानी, विनम्र, हसमुख.
सगळं तसंच तर आहे.
जुन्या स्टाईलचं तरीही स्वच्छ चकचकीत फर्निचर.
पारशी मंडळी होतीच.
बाकीही लोकांची गर्दी खूप.
सहज काऊंटरवर लक्ष गेलं.
एकदम घनाला ओळखलंच.
त्यानही मला फटाकसे ओळखलं.
"घना.."
"केळ्या"
मिठामिठी.
पब्लिक मॅडसारख्या बघतच बसलं.
काऊंटर कुणावर तरी सोपवून तो बाहेर आला.
समोर दोन चार संगमरवरी टाॅपवाली गोल टेबलं होती.
तिथं बसलो.
घनानं माझ्या आवडीचे तेच केक्स मागवले.
तो केकमय श्वास पोटात भरून घेतला.
केकचा पहिला तुकडा पोटात घेतला...
आणि आनंद पोटात माईना.
टाईममशीनमधे बसलो.
भुर्कन् ऊडून फ्लॅशबॅकमधे.
शाळा, दोस्त, खेळ.
भरपूर गप्पा झाल्या.
एकदम तेव्हाचे न सुटलेले प्रश्न आठवले.
"बेकरीचं नाव नवरोझ.
तुम्ही कुलकर्णी.
हे कसं काय बुवा ?"
"सांगतो.
माझे वडील दत्तात्रय कुलकर्णी.
वयाच्या दहाव्या की बाराव्या वर्षी वाईहून ईथे आले.
घरी अठरा विश्वे दारिद्र्य.
आईविना पोर.
सावत्र आई छळ छळ छळायची.
सहन होईना.
घरनं पळाले आणि कसेतरी ईथे पोचले.
रात्री बेकरीच्या पायरीवर मुटकूळं करून झोपले.
पोटात अन्नाचा कण नाही.
सकाळी बावाजीनं बेकरी ऊघडली.
माझ्या वडिलांना आधी पोटभर खायला दिलं.
'माझ्याकडे काम करशील ?"
"सांगाल ते काम करीन"
ढोर मेहनत.
तल्लख बुद्धी.
गणित पक्कं.
काम सांभाळून रात्रीच्या शाळेत शिकायचे.
पटापट हिशेब करायचे.
सगळी कामं शिकून घेतली.
अगदी पारशी गुजराती सुद्धा.
त्या काळी गावात,
पंचवीस तीस हजार पारशी लोक असायचे.
बेकरी अग्यारीच्या रस्त्यावर.
धो धो चालायची.
बाबा सांगायचे ना...
नवरोझच्या दिवशी,
पाऊल ठेवायला जागा मिळायची नाही.
आमच्या वडिलांशिवाय बावाजीचं पान हलेना.
बाबांच्या लग्नाचा खर्च सुद्धा त्यांनीच केला.
बावाजी थकत चाललेले.
त्यांची एकुलती एक डिक्री.
लग्न करून इंग्लंडला गेलेली.
बावाजी एकटा.
माझ्या आई वडिलांनी खूप सेवा केली बावाजीची.
तो जाताना बेकरी आणि घर,
वडिलांच्या नावावर करून गेला.
तो गेला तो दिवस सुद्धा आजचाच.
नवरोझचाच.
सगळं तसंच चालूय.
बाहेरच्या माणसाला कळणारही नाही.
आम्ही पारशी नाही, कुलकर्णी आहोत म्हणून.
खरं सांगू ?
काय फरक पडतो ?
प्रेम, आपुलकी, सेवा आणि माणुसकी खरी.
जातीची लेबलं कशाला लावायची ?"
मी मनापासून ऐकत होतं.
आता पर पोट टम्म फुगलं.
" अरे ते पारशी बावाचं भूत ?"
'बावाजीच्या घरावर एका गुंडाचा डोळा होता.
त्याची माणसं त्रास द्यायची.
म्हणून वडिलांनीच भूताची अफवा ऊठवून दिली.
खरं सांगू ?
त्याचं भूत खरंच असतं ना तरी चाललं असतं.
प्रेमच केलं असतं भुतानं त्या'
मग सांसारिक गप्पा.
बायकापोरांच्या गप्पा.
घना सांगत होता.
'एकुलती एक मुलगी.
हैद्राबादला दिलीय.
नातू आहे.
छान चाललंय तिचं.
मी आणि ही.
दोघंच दोघं एवढ्या मोठ्या घरात.
आई बाबा दोघंही गेले.
वाईला घर बांधलंय.
काऊंटरवरचा तो तरतरीत पारशी पोरगा बघ.
बमन नाव त्याचं.
वडील नाहीयेत त्याला.
आईबरोबर राहतो.
परिस्थिती बेताची.
तयार'होतोय हळूहळू.
प्रामाणिक आणि मेहनती.
माझी कपॅसीटी संपली की,
एक दिवस हे सगळं त्याला सोपवणार..
आणि आम्ही दोघं वाईला जाऊन राहणार...
बावाजींच्या डोळ्यात फक्त,
नवरोझची काळजी वाचलीय मी.
मी मनोमन वचन दिलंय बावाजीला.
मालक बदलला तरी नवरोझ चालूच राहणार"
सगळं ऐकलं आणि घना एकदम ग्रेट माणूस वाटला.
मी मस्त मिठी मारली त्याला.
हॅप्पी नवरोझ म्हणलं आणि निघालो...
कोपर्यापर्यंत पोचलो असेन तेवढ्यात,
बमन पळतपळत आला.
पॅक्ड केक्स.
"मेमसाबसाटी दिलाय.
पुन्यांदि येवा.
हॅपी नवरोझ"
मीही आनंदानं म्हणलं.
"हॅपी नवरोझ बमन.
जुग जुग जियो नवरोझ."
.......कौस्तुभ केळकर नगरवाला.