पुनश्च हरि ओम
गडबड.
गडबड...
दोन दिवस झालेत.
आजीची नुसती धांदल ऊडालीये.
आजीनं तिची ठेवणीतली पैठणी तैयार ठेवलेली...
पितळी फुलांची परडी घासून पूसून लख्ख.
रघुला मुद्दामहून चंदनाची मसाला काडीवाली ऊदबत्ती आणायला सांगितलेली.
ओल्या वाती तयार आहेत.
नाकातली नथ, निरांजन रिठ्याच्या पाण्यानं लख्ख चकचकीत करून ठेवलीये...
है तैयार हम..
आजीचं आख्खं आयुष्य भाऊ महाराज बोळात गेलेलं.
आजोबांचं दुकान होतं जुन्या कावरेपाशी.
तेच दुकान आता त्यांचा मुलगा रघु चालवतोय.
भाऊ महाराज बोळात वाडा होता भलामोठा.
दहा वर्षांपूर्वी मोठ्ठी बिल्डींग झाली त्याची.
पन्नास का साठ ?
नक्की किती वर्ष झाली कुणास ठाऊक ?
नक्की आठवत नाही.
पहिल्या पहिल्यांदा सासूबाईंबरोबर...
नंतर ?
आजी एकटीच.
सूनबाईला कसं जमणार ?
ती बिचारी नोकरीवाली.
सकाळचं सगळं आवरून झालं की दहाच्या सुमारास निघायचं.
हातात फुलांची परडी, ऊदबत्ती, वातीचं निरांजन,फुलं,
खडीसाखरेचा नैवेद्य.
तुळशीबागेत रामरायाचं दर्शन घ्यायचं.
फुलं वहायची.
निरांजन ऊदबत्ती पेटवायची.
मनातल्या मनात आरती..
प्रसाद घेऊन आपल्या दुकानात जायचं.
आजोबांना, रघूला, दुकानातल्या कामगारांना प्रसाद द्यायचा.
आणि घरी यायचं.
दुपारच्या जेवणाची तयारी.
दुपारी आजोबा, रघु जेवायला यायचे..
मागच्या पानावरनं पुढच्या पानावर..
ऊन, पाऊस,वारा एकही दिवस खंड नाही.
कितीही संकटं येऊ देत.
आजी कधी खचली नाही.
रामाचं दर्शन घेतलं की आजीला लढायचं बळ मिळायचं.
कशाला काळजी करायची ?
आहे ना माझा रामराया.
तो बघून घेईल सगळं.
कन्सिटन्सी म्हणजे आजी.
वाट्टेल ते होवो..
आजीचा नेम कधी चुकला नाही.
पण....?
गेलं दीड वर्ष...
जाऊ दे...
दहा वेळा बजावून सांगितलंय रघूला.
सकाळी लवकर जा आणि बाबू गेनूपासून मला ताज्या फुलांचा हार आणि वेणी घेऊन ये..
आणतो..
रघू नाही विसरायचा.
मीही येतो तुझ्याबरोबर...
काही नको.
तू जा आपला दुकानात.
आहे रामराया पाठीशी माझा.
नऊवारी पैठणी.
नाकात नथ.
अंबाड्यावर वेणी.
एक चाफ्याचं टप्पोरं फूल केसात माळलेलं.
फुलांची परडी, ऊदबत्ती, तबक, निरांजन, ऊदबत्ती ,हार.
आज्जी रेड्डी..
काय झालं कुणास ठाऊक.
हाॅलमधे रामाची मोठी तसबीर आहे.
आजीनं नातवाकडनं तो हार तसबीरीला घातला.
मनोभावे हात जोडले.
निरांजन पेटवलं.
ऊदबत्ती लावली.
आरती म्हणून झाली..
का ?
काय झालं ?
"मी कुठं जात नाही की माझा रामराया कुठं पळून जात नाही.
दीड वर्ष थांबले अजून पंधरा दिवस.
दसर्यानंतर जाईन.
पहिल्या दिवसापासून कशाला गर्दी करा ?
ऊगा माझ्यापाई तुम्हाला कशाला आक्सीजनवर ठिवू ?"
पटलं..
आज्जी तुस्सी ग्रेट हो..
तसबीरीतल्या प्रभू रामचंद्राला सुद्धा हे पटलं असावं बहुधा.
खुदकन् हसले हळूच प्रभू तसबीरीतले.
आजीनं हे पाहिलं तर.
मग आजीही हसली खुदकन्...
कृपा असू दे रामराया !
पुनश्च हरि ओम् !
..............कौस्तुभ केळकर नगरवाला.