काय_चुकलं_तिचं..?
*#काय_चुकलं_तिचं..?*
फायनली अरुंधती घराचा उंबरठा ओलांडून घराबाहेर पडली...पण का ? तिने असे करायला नको होतं ! ...जगात अशी कितीतरी उदाहरणे घडतात की , बाहेर नवऱ्याचं अफेअर चालू असूनही ...त्याच्या चुका बायको नजरेआड करते , का तर...घर उन्मळून पडायला नको म्हणूनच ना ! ....मग गप्प बसून हा तमाशा पहायचा का ? ...
सोसायटीत ईव्हीनिंग वॉक ला गेल्यावर कानावर पडलेली ही वाक्ये बायकांच्या संवादाची...! कळत नकळत का होईना मी ह्या सिरीयल च्या प्रेमात पडले होते . सोयीप्रमाणे हॉटस्टार वर ह्याचे भाग पाहते ...कारण ही सिरीयल बघ , छान आहे म्हणून सासूबाईंनी केलेली शिफारस !? ह्या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य , मध्यमवर्गीय कुटुंबातील हसरं वातावरण इथं बघायला मिळते ...नकळत का होईना आपल्या घरातही अश्याच काहीशा गोष्टी , वाद - संवाद , लुटुपुटू च्या करामती घडतात ! पण साधं सरळ चालेल ते जीवन कसलं ...! सिरीयल किंवा चित्रपट म्हटला की व्हीलन चे पात्र हवेच की !
" आई कुठं काय करते ?"
ह्या सिरीयलची नायिका अरुंधती देशमुख ..अगदी सालस , सभ्य गृहिणी !
लग्नानंतर काही कारणाने शिक्षण अपुरं राहिलेलं ! गृहिणीची कर्तव्ये पार पाडताना कुटुंबाची भक्कम आधार बनली . स्वतःच्या इच्छा - आकांक्षा दडपून घर भक्कम बनवले . सासू सासऱ्यांची सेवा करता करताच त्यांच्या हृदयात लेकीचे स्थान निर्माण केले . ही सगळी कर्तव्ये पार पाडताना , मुलांना वाढविताना , लग्नानंतरची २५ वर्षे कधी आणि कशी सरली हे तिचं तिलाच कळले नाही !...घर , मुले, नवरा , सासू सासरे , नातलग हेच तिचं आयुष्य बनून राहिलेलं !
पण ..अश्याच एका अनवट वळणावर आपला नवरा अनिरुद्ध चे अफेअर कानावर पडते . ह्या सगळ्या ऐकीव गोष्टींवर ती मुळी विश्वास ठेवायलाच तयार नसते . कारण ऑफिसमधील कलीग संजनाच्या प्रेमात आपला नवरा पडलाय ! हे तिला मान्य च नसते . उलट ती आपल्या मैत्रिणीला सुनावते की , दिवसभर एकमेकांच्या सहवासात ही दोघे असतात तेंव्हा मैत्रीचं नातं हे निर्माण होणारच ना ! परंतु सत्य तुमच्या कानी येईपर्यंत गावभर फिरून आलेलं असतं ...!
किंबहुना हे सत्य स्वीकारण्याची तुमची मानसिकताच नसते , का तर...आपल्या माणसावर ठेवलेला डोळे झाकून विश्वास...आणि इथंच अरुंधतीच्या विश्वासाला तडा गेला .
आपल्या नवऱ्याचं गेल्या सतरा वर्षांपासून संजनाबरोबर असलेले अफेअर ...अरुंधती नजरेआड करू शकली नाही आणि म्हणूनच तिने त्यातून घटस्फोटाचा निर्णय घेतला . खरंच काय चुकलं तिचं..? मैत्रिणीने दिलेल्या भक्कम आधाराच्या जोरावर स्वतःच आकाश विस्तारायला निघालेली ही एक स्त्री ! प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार घरच्या गृहिणीचा उपयोग करून घेतात . दिवसभर घरात तर असते...तिला कशाला हवी स्वतःची स्पेस ! अशीही काही वाक्ये कानावर पडतात तेंव्हा वैषम्य वाटते ..ह्यात
पुरुषांबरोबर काही स्त्रिया ही आघाडीवर असतात .
अशा अनेक गृहिणी आहेत , अरुंधती सारख्या
आपल्या दिराला भावाची माया , नणंदेवर जिवापल्याड प्रेम करतात. घरी काम करणाऱ्या विमल ला एका बहिणीची माया अरुंधती ने दिली . तिच्या कुटुंबाला ही स्वतःच कुटुंब मानलं . बाप - लेकात झालेल्या वादामुळे घराला दुरावलेल्या दिराला घराकडे पुन्हा अक्षरशः खेचून आणलं . जिथं जाईल तिथं फक्त माणसं जोडत गेली पण स्वतःच्या आयुष्यात मात्र अपयशी ठरली , ते नवरा अनिरुद्ध ला जिंकण्यात ! ह्यात काय चुकलं तिचं..? जिवंत असूनही आपलं माणूस आपल्यापासून दुरावतोय या सारखी दुसरी शोकांतिका कसली असणार ? खरंच गृहिणी असणं हा एक अवघड जॉब च आहे ...कारण तमाम समाजाच्या वतीने , ती कुठं काय करते ..? हीच भावना प्रत्येकाच्या मनात असते .
सर्व प्रेक्षकांना ह्या दोन
तीन भागाने नक्कीच रडवले असणार ! बायकोने आपल्या प्रेयसी सारखं वागलं तर चालेल का ..? ...नाही ना !
बायको ही बायकोच असायला हवी , ती प्रेयसी बनता कामा नये...ही आपल्या समाजाची पुरुषप्रधान संस्कृती...!
काही त्याला अपवाद असतील ही पण अपवादानेच ...!
अरुंधती घराबाहेर पडू नये म्हणून सासूची विनवणी अनेक उदाहरणे दाखल...का तर ह्यात एक स्वार्थी पण प्रेमळ विचार डोकावतोय ...ह्या वयात आम्ही कोणाकडे बघू ! दोघींचं नातं इतक्या
वर्षात इतकं दृढ बनलेलं असतं की पुढील जन्मी आपण एकमेकांच्या मैत्रिणी नक्कीच बनू ! असे आश्वासन मिळवून अरुंधती घराबाहेर पडते .
सासरे आप्पांचा आश्वासक हात डोक्यावरून फिरतो तेंव्हा
मात्र तिचा बांध फुटतो .
एक बाप आपल्या मुलाच्या चुकांवर पांघरूण न घालता सुनेच्या पाठी उभा राहतो.
तू फक्त लढ ....आम्ही तुझ्या सोबत आहोत म्हणतचं...! प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून वागा हा मोलाचा सल्ला अरुंधती आपल्या मुलांना देते .
.... मला राहून राहून ह्या गोष्टींचं आश्चर्य वाटतं की ....अशा अनेक अरुंधती वर अवलंबून घरातले सगळेच असतात तर मग का नाही सांगितलं सगळ्यांनी मिळून ....अनिरुद्ध ला की , तू संजना ला घेऊन दुसरीकडे राहा ...!
अरुंधती ला आपली मुलगी मानणारे आई - आप्पा का नाही ठणकावून सांगत आपल्या मुलाला की , ती आमची मुलगी असून ती याच घरात राहणार....!
घटस्फोटानंतरही.....!कदाचित तसं सांगून म्हणूनही झालंय ! पण स्वाभिमानी अरुंधती घराबाहेर पडण्याचं पाऊल उचलते ...तर ...
काय चुकलं तिचं...?
एखाद्या घराची ओढ च अशी असते की तिकडे माणूस आपोआप ओढला जातो ...का तर तिथल्या गृहिणीचं आदरातिथ्य , आपुलकी !
डिव्होर्स पेपरवर सह्या करताना हात थरथरतात.. एक क्षण अरुंधती माघार घेईल का ? असा विचार अनिरुद्ध च्या मनात डोकावतो . पण नाही....!
डिव्होर्स सबमिट झाल्यावर खरा हतबल होतो तो अनिरुद्ध ! आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत हे सांगताना त्याचा स्वर हळवा होतो !
ज्याला आपण सर्वस्व अर्पण केलं तो असं वागूच कसा शकतो . असे काय मोहाचे क्षण येतात जे आपल्यात नाहीत ते बाहेर शोधतात ही मंडळी ! सगळ्याच प्रश्नांची उकल होऊ शकत नाही . एक स्त्री असूनही सवती चा तिरस्कार न करता अरुंधती नवऱ्याला सुनावते ...संजनाला असे वाऱ्यावर सोडू नका जर तुम्ही तिला सोडलं तर तिची अवस्था भयंकर वाईट होईल , लग्न करा न करा ...हा तुमचा प्रश्न आहे ...पण मला मात्र तिची दया येते ....केवढा मोठा हा उदात्तपणा...!
इथेच अरुंधती आयुष्यात हरून ही जिंकली कारण तिने सगळयांच्या मनाचा ठाव घेतला .
एकदा का माणसाने सत्य स्वीकारायचं ठरविलं
तर त्यापुढे सगळ्या गोष्टी नगण्य ठरतात . राग लोभाच्या पल्याडही....!
संजनाला आधार देताना घरच्या रक्ताच्या नात्याला जपताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल अनिरुद्ध ! पण कालांतराने तुम्हाला हे नक्कीच जमेल . आपला डिव्होर्स झाला असला तरी मी कधीही तुमचं वाईट चिंतलं नाही अनिरुद्ध !...चला येते मी, काळजी घ्या , म्हणत अरुंधती आपलं गळ्यातील मंगळसूत्र काढून अनिरुद्धला परत करते....आता हे कोणाला दाखवायची गरज नाही , माझ्या घरासाठी , सासूसाठी हे घालत होते . उघड्या डोळ्यांनी सगळं दिसत असूनही....!
इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका फुटतो . कुठलीही स्त्री मंगळसूत्र ला हात घातला की पेटून उठते . अतिशय हेलावून टाकणारा हा प्रसंग होता . माहेरी परतताना मुलगा यश तिला सावरतो ...!
भयानक शोकाकुल अवस्थेतच ! व्यापता न येणारं हे अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम ...!
म्हणजे आईच ! निर्व्याज प्रेमाची ती जननी ...!
आई ला उर्वरित आयुष्यात जड अंतःकरणाने पुढे जाण्यास बळ देतात तिची ही तिन्ही मुले ! स्वतःच्या आईची फिनिक्स भरारी पहायला, ही मुले नक्कीच उत्सुक असणार !
ह्या सर्व प्रकारात भांबवलेला असतो तो अनिरुद्ध ! अंगणात आल्यावर तुळशी वृन्दावनापुढे थबकतात त्याची पावले ! ...अरुंधती
चा भास पावलोपावली जाणवतो . प्रेयसी संजनाच्या चेहऱ्यावरचा आनंद ही न पेलू शकणारा ...! अनिरुद्ध , मला अरुंधती च्या नजरेची , शांतपणाची भीती वाटायची ...! कायद्याने आता घटस्फोट झालाय पण मनाने कधीच झाला होता ना...! ...हे सगळे संजनाच्या तोंडून ऐकताना अनिरुद्ध चे कान बधिर झाले होते .
अरुंधती ची ही अवस्था
कोलमडून पडलेली....!
सोप्पं नसतं आपल्या माणसांना सोडून देणं ! एक तुटलेलं घर फुटलेल्या आरशासारखं !
....आरशात पाहताना गळ्यात मंगळसूत्र नाही म्हटल्यावर....दाबून ठेवलेला हुंदका फुटतो , आईला मिठी मारताना !
विषयाला कलाटणी देत मैत्रीण देविका पुढे येत सांगते आरु....तुला हे सगळं स्वीकारताना राग येईल , चिडचिड होईल , रडावसं वाटलं तर रड..!
पण मनात साठवून ठेऊ नकोस नाहीतर हे सगळं आपल्या शरीरात पसरत जातं एखाद्या रोगासारखं!
आपण हतबल झालो असताना , धीर खचलेला असताना , आधार मिळाला की ती स्त्री एक पाऊल पुढे सरकते , येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायला...!
अरुंधतीची आई ने समजावले असेल .....! सावर स्वतःला ..." जगणं हा एक खेळ असतो . काही डाव आपण हरतो तर काही जिंकतो . हा डाव तू जिंकण्याच्या प्रयत्नात हरलीस समज !
आणि इथून पुढे तुला जिंकायचं आहे...! "
साधं सरळं असं आयुष्य प्रत्येकीच्या वाट्याला येईल असं नसतं . जीवनात अनेक संकटे येतील ती पेलण्याची ताकद हवी. परित्यक्ता जीवन जरी वाट्याला आले तरी परमेश्वराची इच्छा समजून
त्यावर मात कर . प्रत्येकाच्या वाट्याला संसार सुख येतंच असे नाही तर काही लोक अनेक वर्षे एकत्र राहात असूनही जीवनात दुःखी असतात .
आईचे बोल ऐकून अरुंधतीने अतिशय निर्धाराने डोळ्यातील अश्रूंना परतावून लावले . आणि नव्या आयुष्याला सामोरे जायला ती सज्ज झाली .
वाट एकटीची असली तरी ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे अनेक अडथळे पार करत पुढे जाणारी...!
खरंच असं....!
*#काय_चुकलं_तिचं..?*
©️®️ सौ राजश्री भावार्थी
पुणे