story

राजश्री भावार्थी

मला काही सांगायचं तुला !!

*मला काही सांगायचं तुला !!"*



   .....हॅलो , दर्शन ....

मला काही सांगायचं तुला ..!! रिद्धीमा ने रात्रभर विचार करून सर्व काही कथन करायचा निर्णय घेतला !! तिला लग्नापूर्वी ज्या काही गोष्टीला सामोरे जावे लागले त्या गोष्टी दर्शन पासून मुळीच लपवायच्या नव्हत्या !! ...माणूस एक खोटे बोलला की त्याला दहा खोटे बोलावे लागते आणि मग ह्याची साखळी गुंफता अडचणीत येतो...

वेळीच सावध होऊन काही गोष्टी क्लिअर केल्या की संभाव्य धोका टळतो ! .....मनावरची मरगळ झटकून रिद्धीमा क्लिनिकला जायला निघाली ....पण दर्शनला विचारात टाकून !!

   रिद्धीमा चे आयुष्य तसे साधे सुरळीत चालू होते . आपल्याला समजून घेणारा जो पर्यंत भेटणार नाही तो पर्यंत लग्न करणार नाही हा निर्णयच तिने घेतला होता आई , वडील बिचारे काळजीने थकले होते . भावाने तिच्यापुढे हात टेकले व स्वतःचा संसार थाटला ....तिशी पार करत आलेल्या लेकीला एका बापाने केविलवाणी विनंती केली ....योग्य स्थळ बघून सुखाने संसार करताना पहायचे आम्हाला . आई मात्र रिद्धीमा च्या पाठीशी ठामपणे उभी होती . कारण सत्य काय ते फक्त त्या माऊलीला च माहीत होते....पण आता आपल्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपविण्यात अर्थ नाही समजून रिद्धीमा वर ओढवलेल्या प्रसंगाची कहाणी ...आणि त्यातून तिने घेतलेल्या फिनिक्स भरारीची कथा तिच्या बाबांना सांगितली . तेंव्हा मात्र एक बाप कोलमडून पडला होता ....काचेला तडा गेल्यावर त्याचा चक्काचूर होतो तसा त्यांच्या स्वप्नांचा झाला होता . पण...विचाराअंती आपल्या लेकीच्या धाडसाचे आणि बायकोच्या स्थितप्रज्ञ वागणुकीचे त्यांना कौतुक वाटले आणि ह्या ही परिस्थितीत झाले गेले विसरून वरसंशोधन तयारी चालू केली .

   परंतु परवा हैद्राबाद रेप प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला आणि रिद्धीमा च्या बाबांच्या छातीत कळ आली क्षणभर तिच्या जागी आपल्या मुलीचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला ....पण समाधान हेच की आपली मुलगी जिवंत आहे .

   .....इकडे दर्शन विचारमग्न अवस्थेत दिवसभर वावरत होता . रिद्धीमा च्या बाबतीत घडलेला थोडा फार प्रकार त्याला माहित होता परंतु तो फिल्म इंडस्ट्री मध्ये वावरणारा एक होतकरू कलाकार , गायक , संगीतकार होता त्या दोघांची भेट एका कार्यक्रमा दरम्यान झाली होती . आणि तो फिल्म इंडस्ट्री मधील गॉसिप जाणून होता ! माणूस म्हटले की अनावधानाने त्याच्या हातून एखादी वाईट गोष्ट घडणारच ! पण काहीही चुकी नसताना भोगाव्या लागलेल्या नरक यातना , समाजाचा दृष्टिकोन ह्याला सामोरे जाणाऱ्या रिद्धीमा सावंत बद्दल त्याच्या मनात सहानभूती ची भावना निर्माण झाली होती . त्यातूनच त्याने तिला दोघांचे सूर जुळताच प्रपोज केले .

अर्थात ह्यावर रिद्धीमाने कधीही अवाक्षर काढलेले नव्हते . आणि म्हणूनच तिने....आज सर्व काही दर्शन ला सांगायचा निर्णय घेतला ...मोबाईल

वाजला तसा दर्शन भानावर आला ...!! पाच मिनिटातच निघतो सांगून आवरायला चालू केले .

   ......नेहमीप्रमाणे रिद्धीमा सावंत चा चेहरा हसरा होता . ह्याउलट दर्शन च्या चेहऱ्यावर ताणतणाव जाणवत होता माणूस अनुभवाने शहाणा होतो . त्यातून बरेच काही प्रसंग निभावून नेता येतात . ह्यानेच रिद्धीमा परिपक्व बनली होती ....

वेटर ...दोन मसाला पापड ...ऑर्डर करून रिद्धीमा ..

दर्शनशी बोलायला सज्ज झाली .

  .....दर्शन रिलॅक्स हो !

मी काही सांगेन त्यावर विश्वास ठेव !! आणि तुला मान्य असेल तरच आपण लग्नबंधनात अडकू !! अन्यथा आपण छान मित्र म्हणून राहू शकतो . तू जरी मला नकार दिला तरी मला बिलकुल कसलीही खंत वाटणार नाही ....!!

  ....रिद्धीमा प्लीज !! मला काहिही ऐकायचे नाही ....काहीही झाले तरी मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे आणि तू जे काही सांगणार त्याबद्दल मी थोडेफार ऐकून आहे . जग काय म्हणेल ह्याचा विचार मी करत नाही. मानसी माझी बहिण तुझी मैत्रीण आहे . तिनेही मला काही गोष्टी सांगितल्या पण एकंदरीत तुझे शालीन वागणे बघून आम्हा कुटुंबियांना तू पसंत आहेस !! ...बस्स !!

ह्या पुढे काहीही बोलू नकोस ....!!

    चुकतोस तू दर्शन ...

थांब !! मला बोलू दे प्लीज !! म्हणून रिद्धीमाने तिच्या आयुष्यात बेतलेला प्रसंग कथन करायला सुरुवात केली ...मेडीकल

चे दुसरे वर्ष संपले त्याचे सेलिब्रेशन करायला आम्ही मित्रमंडळी ट्रिपला गेलो . परतीच्या वाटेवर जो तो मार्ग बदलत आपल्या गावी रवाना झाले ....मी , रोहित व सुशांत मात्र पुन्हा काही कामानिमित्त हॉस्टेलवर परतणार होतो . जवळचे मित्र असल्याने मनात कसलाही किंतु नव्हता ...

पण त्या रात्री दोघांनी ड्रिंक्स घेतल्याने त्यांचा मनावरचा ताबा सुटला .

त्यांच्या कडून हे कृत्य घडले ....भानावर आल्यावर मी बेशुद्धावस्थेत पाहून दोघांची पाचावर धारण बसली ! ....शुद्धीवर आल्यावर मला प्रचंड धक्का बसला होता ....!

परंतु मी पुन्हा पुन्हा ग्लानीत जात होते ....!!

रोहित आणि सुशांतला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता ह्यातून काहीतरी मार्ग काढणे क्रमप्राप्त होते ...

त्यांनी आमच्या कॉलेज च्या प्रिन्सिपॉल (डीन ) च्या मदतीने मला हॉस्पिटलमध्ये हलवले ...

हळूहळू धक्क्यातून सावरल्यावर मात्र एकदा डॉ शर्मा ( डीन ) ह्यांनी आम्हा तिघांची एक मिटिंग घेतली ..! त्या वेळेस रोहित व सुशांत नी माझी मनोमन माफी मागितली . दोघांनीही लग्नासाठी मागणी घातली ....त्यांना त्यांच्या कृत्याचा भयंकर पश्चाताप

होत होता . दोघेही अनेक अडचणींवर मात करुन शिक्षण घेत होते ...डॉ . शर्मा यांनी तिघांची बाजू समजून घेत ...नकळत हे कृत्य घडल्याने ...रिद्धीमा तू त्यांना माफ करावे असे मला वाटते ....तुला दोघांपैकी कोणाशी लग्न करावे वाटते ? ह्याचा तू निर्णय घे !!....आणि हो प्लीज ह्या गोष्टीची वाच्यता कोठेही होऊ देऊ नका . तिघांच्या भवितव्याचा प्रश्न व कॉलेज चे नाव खराब होण्याचा धोका !! तसेच समाजाचा दोषारोप ह्याला तुम्हाला सामोरे जावे लागेल ते वेगळेच !!

     अचानक हे कथन करताना रिद्धीमा हुमसुम हुमसुम रडायला लागली .

दर्शनचा अश्वासक हात पाठीवर पडताच , पाण्याचा घोट पिऊन ती शांत झाली व पुढे बोलू लागली ...म्हणजे एकंदरीत डॉ शर्मा यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला का ? .......

दर्शन ने चिडून विचारले ..

नाही ...नाही बिलकुल गैरसमज करुन घेऊ नकोस !! त्यांनी फक्त आमचे आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून मदत केली ! परिस्थितीची जाणीव करून दिली .

आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा कधीही रोहित व सुशांत ला इथे यायचे नाही ह्याबद्दल सक्त ताकीद दिली होती .

आणि ह्या घटनेच्या चुकीबद्दल ( लालूच नाही ) म्हणून ह्या दोघांनी

मला त्या वेळेस एक चेक दिला !!

   दर्शन ...क्षणभर एक दीर्घ पॉज घेऊन रिद्धीमा पुढे बोलू लागली ...नंतर

ही ह्या दोघांनी मला कधीही हिणावले नाही ...

अजूनही त्यांचे माझे बोलणे कधीतरी मैत्रीच्या नात्याने चालू आहे ....!!

आणि मी ठरवले ह्या पुढे मी समाजातील रेप पिडीत व्यक्तींसाठी काम करायचे ! त्या साठी ..या पुढे ह्या दोघांनी मला तह हयात मदत करण्याचे अश्वासन दिले . बलात्कार

ग्रस्त , हतबल स्त्रियांना मी माझ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करणार आहे !! पण त्याच बरोबर समाजात अशा घटना पुन्हा कधीही घडू नयेत म्हणून आम्ही जनजागृती करत आहोत !! आणि हो 

डॉ . शर्मा मला माझ्या वडीलांप्रमाणे आहेत . त्यांनी मला आपल्या मुली

सारखे प्रेम दिले आहे ....!

दर्शन तू ही त्यांची भेट घे.

आणि पुढील निर्णय घे !! घाई करू नकोस ...नंतर

मी कुठल्याही प्रकारचे बोल ऐकून घेणार नाही...

चल निघुया आता !!

   रिद्धीमा थांब ! माझ्या निर्णयावर मी ठाम आहे . मला तुझ्या धाडसाचे , कार्याचे कौतुकच आहे . माणूस चुकतो जरूर पण त्यांना चुका सुधारण्याची एक संधी तू दिलीस ह्याचे

मला आश्चर्य वाटते !!

   एखाद्या वळणावर असा प्रसंग घडला तर ती

व्यक्ती थकली , हरली असती ...पण त्या वळणावर तू जगण्याचे आव्हान स्वीकारले ...!!

आणि जिंकण्यासाठी .... लढायला सज्ज झालीस !

.....म्हणूनच रिद्धीमा तू माझ्या लेखी कौतुकास पात्र आहेस ....आणि अशी च धर्मपत्नी मला लाभावी ह्यासारखे भाग्य कोणते ? 

   अगं ! आयुष्याचा अर्थ

कळतो मागे वळून पाहताना आणि ते जगावं मात्र लागतं पुढे बघून ...!!

   आणि आज रिद्धीमा डोळ्यातील ओघळणारे आनंदाश्रू अलवार टिपत दर्शन च्या साथीने चालू लागली ....सप्तपदीच्या पाऊलवाटेवर .....!!

मार्गक्रमण करत .....!!



©️सौ राजश्री भावार्थी

     पुणे 


  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

राजश्री भावार्थी