आईला अग्नी द्या. पैसे पाठवतो.
आईला अग्नी द्या. पैसे पाठवतो .
(लेखक: निरेन आपटे )
माणूस जीवनभर धावपळ करतो, अमाप कष्ट करतो. खूप काही सोसतो. कशासाठी, तर शेवटचा दिवस गोड व्हावा !!
अंतिम विसावा घेताना सगळ्यांची सोबत असावी, मनात समाधान असावं.
पण धावपळ इतकी तीव्र झाली आहे की विसावा राहिलाच नाही. अंतिम विसाव्यालाही वेळ देता येत नाही. शेवटचा क्षण आला की नाही, हे पाहायलाही वेळ नाही.
एकदा पाली ते खोपोली प्रवास करत होतो. अचानक बस पंक्चर झाली. ड्राइवर साहेबांनी आंबा नदीच्या पुलावर बस उभी केली आणि सर्वाना खाली उतरवलं. आसपास दाट झाडी होती. आंबे, गुलमोहर, मुरबाडी साग उभे होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. लक्ष वेधून घेत होती ती फक्त एक पाटी- कृष्ण वृद्धाश्रम !
विचार केला, आपण खूप काही पाहायला जातो. हिमालय, सागर किनारे, वने, डोंगररांगा पाहायला निघतो, पण वृद्धाश्रम पाहायला कधी जात नाही.
आज तोही पाहू.
मुख्य रस्ता सोडून मी आणि पत्नी आत शिरलो. एक कच्चा रस्ता वृद्धाश्रमात घेऊन गेला.
वृद्धाश्रमाचं प्रवेशद्वार अतिशय सुबक होतं. दोन तीन वेली त्यावर चढवल्या होत्या. अनेक रंगांचे पुष्पगुच्छ बहरले होते. एक मुख्य हॉल मध्ये होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत अनेक खोल्या होत्या. वृध्दाश्रमात आर्थिक स्थिती उत्तम असलेली मंडळी राहत असणार हे लगेच लक्षात आलं.
आम्ही स्वागत कक्षाकडे निघालो. आम्हाला पाहून चौधरी काकाही तिथे येऊन उभे राहिले. तिथे त्यांची टेबल खुर्ची होती. आसपास इतकी झाडे होती की गारवा जाणवत असल्यामुळे पंखा लावायची गरज पडली नाही.
चौधरी काका आम्हाला बसवून म्हणाले,
" बोला. कोणाला इथे सोडायचं आहे ?"
मी इथे पालकांना सोडायला आलो आहे असं त्यांना वाटलं होतं. मी म्हणालो,
" पालकांना सोडायला नाही, वृद्धाश्रम पाहायला आलो आहे. "
चौधरी काका अश्यर्यचकित होऊन चष्मा काढून म्हणाले,
" आमचा वृद्धाश्रम पाहायला येणारे तुम्हीच पहिले. चालेल, मी तुम्हाला आमचा आश्रम दाखवतो. "
आम्ही चौधरीकाकांसोबत आश्रम पाहायला निघालो. आश्रमात छोटी बाग होती आणि ती राखण्याचं काम आश्रमातील वृद्ध करत होते.
आश्रमात खूप स्वच्छता आणि नीटनेटकेपणा होता. अनेक छोट्या खोल्या केल्या होत्या. प्रत्येक खोलीत दोन वृद्ध राहत होते.
मधोमध एक हॉल होता. चौधरी काका सांगू लागले,
" इथे सर्व आजी-आजोबा एकत्र जेवतात. भरपूर गप्पा मारतात. भजन करतात. शिवय टेबल टेनिस, कॅरम आहे. वरच्या मजल्यावर भरपूर पुस्तके आणि दोन कॉम्प्युटर आहेत. "
आश्रम दाखवताना चौधरी काका सांगू लागले.
"जेव्हा गाण्याच्या भेंड्या होतात तेव्हा आम्हा म्हाताऱ्यांना गळे फुटताट. पण इथे कोणीही गळे काढत बसत नाहीत. आपले शेवटचे दिवस मुलांना-सुनेला दोष देत घालवत नाहीत. आपला शेवट इथेच होणार आणि तो हसत -खेळत होऊ द्यायचा हे सर्वानी ठरवलं आहे."
चौधरींनी पुढे जे सांगितलं ते ऐकून थक्क झालो.
जांभूळपाड्यात पूर आला तेव्हा आश्रमातील आजी आजोबांनी गावात जाऊन लोकांना मदत केली. आंबा नदी टम्म फुगून गावागावात शिरली होती. त्या पुरात ही म्हातारी मंडळी बाहेर पडली. पुराचं पाणी आश्रमातही आलं होतं. पण किचनमध्ये शिरलं नव्हतं. म्हणून किचनमध्ये शिजलेलं अन्न गावात वाटायचं ठरलं.
काहींनी हातात भाताचं पातेलं धरलं, काहींनी वरण. एकाने लोणच्याची बरणी आणि एकाने पापडाची पिशवी घेतली आणि आश्रमातील म्हातारे गावकऱ्यांना जेवण वाटत होते. ज्यांना आधाराची गरज होती तेच आधार देत होते.
हे सांगून झाल्यावर चौधरी काकांनी मिश्किल चेहरा केला आणि म्हणाले,
" असं करा, तुम्ही स्वतःच नाव आत्ताच इथे नोंदवून ठेवा. "
मी त्यांना हसून दाद दिली.
बोलता बोलता आम्ही सुंदर विठ्ठल मंदिरासमोर येऊन उभे राहिलो. वासंती जोशी नावाच्या आज्जीच्या मुलाने हे मंदिर बांधून दिल होतं.
चौधरी काकांसोबत विठ्ठल दर्शन करून बाहेर आलो. मग ते सांगू लागले.
“ जोशी आजींचा मुलगा बर्लिन शहरात राहत आहे. जोशी आज्जी बर्लिनमध्ये राहायला गेल्या होत्या. त्यांची सून महाराष्ट्रीयन होती, पण जन्म लंडन मध्ये झाला होता. तिला मराठी येत नव्हतं आणि जोशी आज्जींना मराठीशिवाय एकही भाषा येत नव्हती. बर्लिनचं वातावरण त्यांना मानवल नाही आणि मुलासोबत त्या भारतात परत आल्या. मुलाने त्यांना इथे दाखल केलं आणि वर्षभराचे पैसे एकदम भरून तो परत बर्लिनला निघून गेला.
आजी इथे आल्या आणि दोन दिवसात त्यांचं निधन झालं.
नियमानुसार आश्रमाने मुलाला तात्काळ फोन केला, इमेल सुद्धा पाठवला. पण त्यावेळी तिथे रात्र झाली होती. मुलाने सकाळी उठल्यावर मिस कॉल पहिला आणि इमेल वाचला. तोवर काही तास उलटून गेले होते.
त्याला अश्रु आवरता आले नाहीत. त्याने रडत रडत आम्हाला फोन केला."
आता चौधरी काका खूपच गंभीर झाले, म्हणाले,
" मी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला कल्पना दिली की तू बर्लिनवरून इथे यायला उशीर होणार. इतक्या वेळ तुझ्या आईचा मृतदेह ठेवता येणार नाही. तेव्हा तू आम्हाला इमेल वरुन लेखी परवानगी दे. आम्ही तुझ्या आईचा अंतिम संस्कार पार पाडू "
शेवटी ही बाब मुलाला पटली. त्याने इमेल पाठवला.
ज्यात लिहिलं होतं - आईचा अंतिम संस्कार पार पाडा, तो खर्च मी तुमच्या खात्यात ताबडतोब ट्रान्स्फर करतो.
आणि एक विनंती... मृत आईचा फोटो आणि व्हिडिओ व्हाट्स ऍप वरून पाठवा. मला शेवटचं दर्शन घेता येईल.
मुलाने सांगितल्यानुसार वृद्धाश्रमातील चाळीस वृद्ध एकत्र आले आणि त्यांनी जोशी आज्जीचा अंतिम संस्कार केला.
मुलाला फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आला.
बर्लिनमधील जोशी आजींच्या मुलाच्या मनाला खूप लागलं. तिची स्मृती म्हणून त्याने वृद्धाश्रमात मंदिर बांधायला पैसे ट्रांसफर केले.
पैसे कुठूनही ट्रान्स्फर करायची सोय आहे. हातात मोबाइल, मेल आहे, व्हाट्स ऍप आहे. एका चुटकीत खूप काही करता येतं. फक्त माणूस माणसाला भेटू शकत नाही. मृत आईचं अंतिम दर्शनही घेता येत नाही.
सतत धावणारं जग आता कुठे येऊन पोहोचलंय पहा. विकास विकास म्हणून उर फुटेपर्यंत धावपळ चालली आहे. खरंच, आपण योग्य दिशेला पळत आहोत का?
विकासाची व्याख्या पुन्हा तपासायला हवी का?