article

राजश्री भावार्थी

मनातील हरतालिका

मनातील हरतालिका 

दरवर्षी भाद्रपद शुद्ध तृतीयेस हरतालिका पूजन करताना मन भूतकाळात रमते ...खूप

काही सुखद , काही खोडकर आठवणी डोळ्यापुढे पिंगा घालतात

.....माझा जन्म सोलापूरचा अर्थात बालपण ही तिथलेच ! ...

माहेरी सगळे कुटुंब स्वतंत्र रहात असले तरी सणावाराला एकत्र जमण्याचा सर्वांचा मानस न तितकाच उत्साह !


घरातील मोठ्यांचा विशेष करून आजोबांचा धार्मिक स्वभाव ! आजीचा सोवळा स्वयंपाक , पूजा अर्चा ! साहजिकच आमच्यावर ही देवधर्म , सणवार धार्मिक महत्व यांचा जबरदस्त पगडा !


हरतालिकेच्या पूजेसाठी उठल्या उठल्या माझी रवानगी आजोबांबरोबर पत्री , फुले गोळा करायला व्हायची ! स्वतःच्या अंगणातील बागेतून तसेच इतर ठिकाणाहून फुले , पाने गोळा करता करता मी अगदी पूजेला काँग्रेस गवत ही उपटून आणायची ! कष्टाची ही कामगिरी पार पाडून पिशव्या भरून आणलेली पत्री न दिसता आई ला नेमके काँग्रेस गवत दिसले न माझ्यावर त्याक्षणी कच्च मडकं शिक्का बसला ....!!?


अशाप्रकारे दिवसाला

सुरुवात झाल्यावर चौरंगाभोवती केळीचे खांब लावून सुशोभित आरास होत असे ! हे सर्व काम आम्ही भावंडे अतिशय आवडीने करत .

वाळूची महादेवाची पिंड , सख्या , पार्वती , अगदी डोंगर , सूर्य , पक्षी , नदी सगळे यथासांग भल्यामोठ्या टेबलरूपी चौरंगावर साकार करत ! बरं प्रत्येकाची महादेवाची पिंड वगैरे वेगळी , अनेक शक्कल लढवून आम्ही डेकोरेशन करत !! .......

भली मोठी रांगोळी साकारत !


समस्त महिलावर्ग उपवासाचे पदार्थ करण्यात मग्न ! त्या दिवशी पदार्थांची चंगळ असायची ! उपवास असा वाटायचाच नाही !


पण खरी मजा पूजा करताना ! आई , आजी पूजेचे महत्व सांगून पूजा कशी करायची सांगत ! माझ्या बालमनाच्या डोक्यात हजार प्रश्न घोळत ! ....आजी सांगे आजचा उपवास मोडायचा नाही . नवरा छान मिळावा म्हणून मनोभावे पूजा करावी ! वगैरे ..वगैरे ...मग माझे उत्तर तयार ! आजी हे असले काही सांगू नकोस मला पूजा जमेल पण लग्न वगैरे हा विचार नाही पटत !...आणि मी लग्न करणार नाही . करायचीच असेल तर नवरे मंडळींना ही पूजा करावी ! हा वसा काय फक्त बायकांनीच घ्यावा का ?


स्त्री मुक्तीचे वारे डोक्यावरून भिरभिरे !! मला उपवासाचे पदार्थ आवडतात , पूजा मान्य !

जसे दिवाळीत किल्ला करून डेकोरेशन करतो तसेच वाळूचे शिल्प साकारायला आवडते , कहाणी वाचन करायला आवडते , म्हणून मी यात सहभागी होते .अशा माझ्या प्रश्न उत्तरावर आई माझ्याकडे रागारागाने बघत ! ....अशी परंपरा वर्षानुवर्षे चालायची . त्या

दिवशी म्हणे दुपारची झोप घ्यायची नाही आणि मी तर भल्या पहाटे उठल्याने दुपारी बसल्याजागी डुलकी घ्यायची ! तेंव्हाच चितळे टाईमचा शिक्का न पुण्याचे सासर हे आईने पक्के केले !


म्हणता म्हणता शिक्षण संपून स्थळे येऊ लागली नी अचानक मोठ्यांच्या इच्छेखातर लग्नाच्या बोहल्यावर चढले , स्थळ सोलापूरच्या ओळखीतून पण मुलगा पुण्यात चांगल्या पोस्ट वर जॉब ला म्हटल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता लग्न पार पडले !


लग्नानंतर वाढत्या जबाबदाऱ्या रितीरिवाज परंपरा मनापासून जपल्या . पण हरतालिका म्हटले की मी नवरोबाला म्हणते चल दोघे मिळून पूजा करू ! उदय पण हसून मनापासून साद घालतो . आज ३१ वर्षाचा संसाररुपी सहवास गुण्यागोविंदाने चालू आहे . पण खंत एकच वाटते की आजकाल सिमेंट काँक्रीट च्या जंगलात सगळेच रेडीमेड मिळते ....पत्री गोळा न करता विकतची गड्डी आणून काम भागते

सणवाराचे महत्व बिलकुल कमी झाले नाही पण उत्साहाचा झरा थोडासा आटला !


जो तो उठल्यापासून ऑफिस टाईम गाठायला धावतो ! लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांची आठवणींची वय वाढत असली तर काळाप्रमाणे

अर्थ बदलत असतात . पण पूर्वीचे निर्व्याज .....

अबोध नातं जपायलाच हवं !


* आज ऐकत नाही वेड मन हे माझं!! *

* बोलायचे बरेच काही , पण ऐकायला कोणी नाही *

* आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला *

* वेळ कोणाला नाही *




सौ राजश्री भावार्थी

पुणे

  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

राजश्री भावार्थी