article

Niren Apte

प्रेमभंग झालेल्यांची दोन गाणी

प्रेमभंग झालेल्यांची दोन गाणी 

-निरेन आपटे


जेव्हा समाज माध्यमांचा प्रसार झाला नव्हता, टीव्ही नुकताच आला होता. त्यावरही फक्त सरकारी चॅनेल होते तेव्हाचा हा काळ. त्यावेळी सामान्य माणूस चाळीत राहत असे. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही नुकताच घराघरात आला होता. त्यामुळे प्रसाराचे मोठे माध्यम म्हणजे रेडिओ होता. आवडती गाणी ऐकायची तर रेडिओ हीच सोय होती. आपण फर्माईश केली तर आपली आवडती गाणी रेडिओवर लागण्याची सुविधा होती. तसे खास कार्यक्रम केले जायचे. ज्याची फर्माईश असेल त्याचे नाव गाण्याआधी ऐकवले जायचे. अशा कार्यक्रमामध्ये दोन गाणी हमखास वाजत असत. एक गाणे होते " जाने क्यू लोग मोहब्बत किया करते है" आणि दुसरे गाणे होते " शिशा हो या दिल हो आखिर तूट जाता है". ह्याच दोन गाण्यांची फर्माईश होण्याचं कारणही होतं.


उच्च शिक्षणाचा नुकताच प्रसार झाला होता. नवीन पिढी कॉलेजमध्ये जाऊ लागली होती. त्यांच्यात प्रेमसुलभ भावना जाग्या झाल्या होत्या. पण प्रेमविवाह जुळणे आजच्या इतके सोपे नव्हते. समाजात पालकांनी जुळवलेले विवाह पार पडत होते. त्यामुळे मुलगा आणि मुलीचं अफेयर हा प्रकार फारसा परिचित नव्हता. प्रेम जुळणे हे फक्त सिनेमांमध्ये घडत होते. त्यामुळे प्रेम करायला उत्तेजना मिळत होती. फक्त तसा जोडीदार मिळत नसे. आपोआप प्रेमभंग होऊ लागले आणि प्रेमभंग झालेल्या तरुणांची संख्या मोठी झाली. त्यांनी ह्याच दोन गाण्यांना जास्त पसंत केले. 


ह्या दोन्ही गाण्यांचे वैशिष्टय म्हणजे दोन्ही गाणी निर्माण करणारे कलाकार सारखेच आहेत. दोन्ही गाणी लिहिली आहेत आनंद बक्षींनी. गायली आहेत लता मंगेशकरांनी आणि संगीतबद्ध केली आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी. ह्यापैकी " जाने क्यू लोग मोहब्बत किया करते है" गाणं "मेहबूब की मेहंदी" सिनेमातील आहे. हा सिनेमा १९७१ साली आला होता. हा काळ होता राजेश खन्नाचा. वास्तविक हा चित्रपट काही खास नव्हता. पण राजेश खन्नामुळे बरा चालला आणि ह्या गाण्याने प्रेक्षकांना थिएटरमध्ये ओढून आणले. हे गाणे लीना चंदावरकरवर चित्रित झाले आहे. त्याकाळी सॅड सॉंग्स हा हुकुमी एक्का होता. म्हणून प्रत्येक गायकाला रसिकांचं मन जिंकण्यासाठी दर्दभरी गाणी गावी लागायची. सिनेमांचा प्रेम हाच विषय असला तरी विरहाचे दृश्य त्यात घुसवून एक दर्दभरे गाणे आणले जायचे. "मेहबूब की मेहंदी" मध्ये तोच प्रकार होता. अपेक्षेनुसार गाण्याने उत्तम परिणाम केला. पण फक्त दर्दभरे गाणे आहे ही ह्याची जमेची बाजू नव्हती. आनंद बक्षींनी शब्दांची जादू केली होती. प्रेम भंगाच्या भावनेला शब्दात अचूक पकडले होते. 


"तन्हाई मिलती है, महफ़िल नहीं मिलती

राहें मुहब्बत में कभी मन्ज़िल नहीं मिलती

दिल टूट जाता है, नाकाम होता है

उल्फ़त में लोगों का यही अन्जाम होता है

कोई क्या जाने, क्यों ये परवाने, 

क्यों मचलते हैं, ग़म में जलते हैं "


प्रेमभंग झालेल्या अनेक तरुणांच्या मनातील बोल बक्षींनी लिहिले. 


त्या काळात हिंदी किंवा मराठी सिनेमातील गाणी हवी असतील तर १० पैशांचे छोटे पुस्तक मिळत असे. ह्या पुस्तकात काही गाणी छापलेली असत. अनेकजण हे गाणे असलेले पुस्तक खरेदी करत होते. त्यामुळे पुस्तक छापणारे पुस्तकात कोणतीही गाणी असली तरी हे गाणे हमखास छापत होते. "मेहबूब की मेहंदी" प्रदर्शित होऊन थिएटरमधून निघून गेला, पुढे राजेश खन्नाचा काळ सरला आणि अमिताभचे हाणामारीचे सिनेमे गाजू लागले. पण हे गाणे कुठे न कुठे ऐकू येत असे. गाण्याची इतकी लोकप्रियता पाहून आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांनी तसेच दुसरे गाणे रचले नसते तर नवल. 


१९८० साली " आशा" चित्रपटाची निर्मिती होत असताना बक्षींनी पुन्हा एकदा प्रेमभंगावर गीत रचले. गाण्याचे बोल होते-" शिशा हो या दिल हो आखिर तूट जाता है". " आशा" हा जितेंद्र, रीना रॉय आणि रामेश्वरीचा सिनेमा. कथा कौटुंबिक होती. जितेंद्रच्या स्टार पदात ह्या सिनेमाने भर घातली, पण खरा भाव खाऊन गेली रीना रॉय. कारण तिला हे गाणे मिळाले. रीना रॉय गायिका दाखवल्यामुळे ती स्टेजवर हे गाणे गाते आणि जितेंद्र व रामेश्वरी पाहायला आलेले असतात असे दृश्य होते. बक्षींनी इथेही बोल लिहिताना कमाल केली होती. 


"बैठे ये किनारों पे, मौजों के इशारों पे 

हम खेले तुफानों से, इस दिल के अरमानों से

हम को ये मालूम न था, कोई साथ नहीं देता 

माँझी छोड जाता है, साहिल छूट जाता है"


वास्तविक आनंद बक्षी भारतीय सेनेच्या सिग्नल विभागात स्विच बोर्ड ऑपरेटर म्हणून काम करत होते. पण त्यांच्यातील गीतकाराने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही आणि ते मुंबईत आले. सरळ-सोपं काव्य लिहू लागले. म्हणून ते ४३ वर्षे सिनेमांची गाणी लिहीत होते. त्यांनी चार हजारपेक्षा जास्त गाणी लिहिली. त्यांना चार वेळा उत्तम गीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. एकदा सिने पुरस्कार आणि दोनदा स्क्रीन पुरस्कारही मिळाला. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन या संगीतकारांच्या धूनवर गीते लिहिणाऱ्या आनंद बक्षींनी नंतरच्या पिढीतील जतिन-ललित, शिव-हरी आणि ए. आर. रेहमान या संगीतकारांच्या धूनवरही गाणी लिहिली. त्यांनी गाणी लिहिताना अनेक प्रयोगही केले. ह्या गाण्यात त्यांनी "लूट" शब्दाचा चपखलपणे वापर केला आहे. 


" दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है 

थोडे फूल हैं, काटे हैं, जो तकदीर ने बाँटे हैं 

अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है 

कोई लुट जाता है, कोई लूट जाता है..."


एक लुटचा अर्थ आहे कोणी स्वतः लुटला जातो तर दुसऱ्या लूटचा अर्थ आहे कोणी लुटून नेतो. फक्त ह्रस्व दीर्घचा फरक आहे. हा फरक गाऊन लता मंगेशकरांनी नेमका अर्थ साधला आहे. ‘कोई साथ नहीं देता’ ह्या ओळीवर लतादीदींनी लावलेला आलाप केवळ दैवी आहे. ऐकणाऱ्याला हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ही जादू लतादीदींच्या सुरांनी केली आहे. 


जेव्हा फारशी माध्यमे नव्हती तेव्हा अत्यंत श्रवणीय गाणी बनत होती. आता माध्यमांचा सुळसुळाट झाला आहे. हवे ते गाणे हवे तितक्या वेळा पाहता येते. पण पुन्हा पुन्हा पाहावी अशी किती गाणी बनतात? नवीन गाणी रसिकांच्या हृदयाचा ठाव का घेत नाहीत? कदाचित असेही असेल की आता प्रेमभंग होत नाहीत. एक नव्हे दोन तीन जोडीदार मिळतात. एका व्यक्तीसाठी झुरत बसणे नवीन पिढीला मंजूर नाही. म्हणून आता तसं प्रेम होत नाही आणि तशी गाणीही बनत नाहीत.


  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

Niren Apte