article

Niren Apte

उल्हासनगर, उपेक्षित उद्योग विश्व!!

उल्हासनगर, उपेक्षित उद्योग विश्व!!


विध्वंस सृजनाचा आरंभ असतो. जेव्हा शुन्य निर्माण होतो तेव्हा तिथून पुढे आकडे वाढत जावू शकतात. असाच विध्वंस पाकिस्तानात राहणाऱ्या सिंधी समाजाने भोगला. फाळणी झाल्यानंतर त्यांना फक्त अंगावरचे कपडे घेवून पाकिस्तान सोडावं लागलं. कराची बंदरावर उभ्या असलेल्या बोटी पकडून ते भारताकडे निघाले. बोटी जातील, तिथे जायच इतकच त्यांना माहित होत. त्यांच्या बोटी मुंबई बंदरावर लागल्या. इतका मोठा समाज अचानक मुंबईच्या बंदरावर आला, त्याचं पुनर्वसन कुठे करायचं हा प्रश्न सरकारला पडला. त्या वेळी मुंबई जवळ सिंधुनगर नावाचं ठिकाण होतं. इथे ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात बराकी बांधल्या होत्या. त्या रिकाम्या पडल्या होत्या. ब्रिटिशांनी transit कॅम्प असं त्याला नाव दिला होतं. सिंधी समाज, काही पंजाबी आणि पाकिस्तानातला मराठी समाज मुंबईच्या बंदरावर आला, तिथून त्यांना शरणार्थी संबोधून सिंधुनागारच्या बराकी मध्ये नेण्यात आलं. तेव्हा सिंधुनगर उजाड होतं.


शुन्य अवस्थेत सिंधी समाज इथे आला. उपासमार सुरु झाली. फक्त अंगावर कपडे होते, आणि दरवाजे नसलेले उघडे संडास....सरकारनी दाखवलेली तेव्हडीच दया. उजाड भागात पैसे कमवण्याची संधी नव्हती. सिंधी फार मोठे मतदार नव्हते. त्यामुळे त्यांना कोणत्याही इतर सुविधा देण्यात आल्या नाहीत . ना नोकरीत आरक्षण होतं, ना त्यांच्यासाठी मोफत घरांची योजना होती. महाराष्ट्रात काही भागांना कमी दराने वीज दिली, handlooms दिल्या. कारण ते फार मोठे मतदार होते. सिंधी नगण्य, त्यांना कोण विचारणार? पण सिंधी हरले नाहीत. त्यांनी पापड विकायला सुरुवात केली. शक्य होईल तिथपर्यंत ते चालत जायचे आणि पापड विकायचे.सिंधुनगरच्या आसपास industrial estate उभ्या झाल्या. पण सिंधूनगरला काहीही सोय दिली नाही. सिंधी चारी बाजूने कोंडीत सापडले. आपला देश आपल्याला शरणार्थी म्हणतोय हा मानसिक आघात त्यांनी पचवला. आणि बराकिंमधून जे बनवता येईल ते बनवायला सुरुवात केली. उद्योग सुरु केल्यावर सरकारी नियम आडवे यायला लागले तेव्हा त्यांनी नियम मोडले. ३ पेक्षा जास्त मजले बांधायची परवानगी नव्हती. सिंधी दुकान सोडून लांब जायला तयार नव्हते. कारण घरात स्त्रिया-वृद्ध-मुले माल तयार करायचे आणि घराच्या पुढे असलेल्या दुकानात विकायचे. पिछे मकान, आगे दुकान ही कल्पना राबवायला अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. Gang -war आलं, पण कोणतीही सोय-सुविधा नसलेल्या सिंध्यानी production चा पाउस पाडला. नकली का होईना, पण माल तयार केला. त्यावेळी भारतीय ग्राहक विदेशी वस्तू घेवू लागला. अमेरिकन product ला प्रचंड मागणी आली. USA नाव वाचून ग्राहक माल खरेदी करू लागले. इथे सिंधी उद्योजकांनी शक्कल लढवली. 


आपल्या प्रत्येक product वर USA छापलं. त्याचा long form होता. ulhasnagar sindhi association . हि युक्ती सिंध्यांच्या कामी आली. उल्हासनगर मध्ये बनलेल्या वस्तू हातोहात खपू लागल्या. आणि काही वर्षात मुंबई इतकी उलाढाल सिंधी करू लागले. त्यांनी स्वयंनिर्मित अर्थकारण उभं केलं... कोणत्याही सवलतीविना. पार्ले पेक्षा सिंध्याची बिस्कीट जास्त खपू लागली. कपडे, चपला, खोटे दागिने जे जमेल ते त्यांनी बनवलं. स्वस्तात इलेक्ट्रोनिक वस्तू विकायला सुरुवात केली. फक्त पाणी विकल नाही. कारण पाणी विकण पाप समजलं गेल.. दरम्यान जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीमुळे सिंधुनगरच नाव उल्हासनगर झालं होतं. उल्हासनगर मध्ये मागाल ते मिळू लागलं. 

फक्त विमाने आणि रणगाडे बनवायचे बाकी राहिले. ती प्रतिभा सिंध्यांकडे होती. पण महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिभेला विचारतय कोण? तोवर कष्टाची जागा भ्रष्टाने घेतली होती. कष्टाळू सिंध्याच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही. इतर ठिकाणी MIDC उभ्या होत गेल्या.


आज अशी अवस्था आहे कि ठाणे जिल्ह्यातील इतर MIDC अयशस्वी ठरल्या. कंपन्या बंद पडल्या. आणि उल्हासनगरचे राबते हात अजूनही कष्टाचं पक्वान्न खातात. तिथे बेकार नाहीत, कारण प्रत्येक मागणीला होकार आहे. मॉल हा प्रकार भारतात पहिल्यांदा सिंध्यानी आणला. फक्त तो एका इमारतीत नव्हता. एका भागात होता. त्यांनी मॉलसारख्या जाहिराती कधीही केल्या नाहीत. उल्हासनगरचा तोंडी प्रचार होत गेला आणि ग्राहक लांबून लांबून उल्हास नगर मध्ये येवू लागले. कारण सिंधी स्वस्तात विक्री करत होते. घरातील स्त्री-वृद्ध आणि मुले दुकाना मागील घरात जाग आल्यापासून झोपेपर्यंत काही ना काही बनवत राहिले. घराच्या पुढील दुकानात करते पुरुष विकत राहिले. तिथले दुकानदार म्हणू लागले कि आम्ही विकत घेतलेल्या किमतीने गहू विकू आणि रिकामी गोणी विकून दहा रुपये नफा कमवू. अश्या लाखभर गोण्या विकून पैसा कमवू. MBA च्या विद्यार्थांना आज जे शिकवतात, ते सिंध्यानी साधारण १९६० पासून प्रत्यक्षात राबवलं. आज दर मैलावर एक resort दिसतं. भारतात भव्य resort ची संकल्पना आधी उल्हासनगर मध्ये जन्माला आली. कलानी ह्यांनी पाहिलं resort बांधलं, जे अनधिकृत ठरवून पाडण्यात आलं. सिंधी समाज दुर्लक्षित राहिला. संख्येने कमी होता, पण एक एक हातात शंभर हातांच काम करण्याची शक्ती होती, आजही आहे.


मग आलं १९९३ साल. भारताने आर्थिक उदारीकरण धोरण स्वीकारलं. Globalization सुरु झालं. विदेशी कंपन्या भारतात शिरल्या. त्यांच्याकडे आर्थिक सक्षमता होती आणि भारतीय सत्ताधारी त्यांच्या पाठीशी होते. विदेशी कंपन्यांनी आज २०१४ रोजी संपूर्ण भारतीय बाजारपेठ गिळून टाकली आहे. ह्या प्रचंड उलाढालीत सिंध्याना कोणीही विचारात घेतलं नाही. एक एक सिंधी, एक एक कारखाना होता...पण राज्यकर्त्यांनी चालू दिला असता तर! 


हा हा म्हणता उल्हासनगर च्या चारी दिशांनी mall उभे राहिले. नवश्रीमंत वर्ग mall कडे गेला. परिणामी उल्हासनगरच production वाढलं नाही. पाणी विकणाऱ्या कंपन्या आल्या....आणि एक सामाजिक घात झाला. पाणी न विकणारे सिंधी सुध्दा पाणी विकू लागले. नव्या युगात त्यांना जगायचं होतं. पाप कराव लागलं.... भारतीय विद्वान अर्थ तज्ञांनी त्यांना पाप करायला लावलं. आता सिंध्यांची chocolate , biscuits कोणी खात नाही. त्याचा दर्जा अगदी हलका होतं हे खरं आहे. जर त्यांना सत्ताधार्यांनी साथ दिली असती तर दर्जा सुधारण कठीण नव्हतं. पण सरकारी दरबारी विदेशी chocolate , biscuits कंपन्याच्या फायली पटापट हलू लागल्या. ना उल्हासनगर चे chocolate उरले ना रावळगावाचे. आमच्याच देशातील प्रतिभेचा गळा घोटला गेला. 


ज्यांनी विध्वंसातून सृजन निर्माण केलं, त्यांचा विध्वंस स्वकीयांनी केला. सिंध्यानी transit camp ला एक industry बनवून दाखवली....आता त्याचा पुन्हा transit camp झाला तर नवल वाटायला नको. 


विदेशी industry ला AC mall मिळतो आणि भारतीय प्रतिभेला transit कॅम्प. 


आपलीच हुशारी" शरणार्थी" झाली!


-निरेन आपटे.


  1. 1
  2. 2

लेखकाविषयी

Niren Apte