स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
एक छोटंसं गाव होतं. त्या गावात नुपूर आणि प्रितम अश्या नावाचं एक जोडपं राहत होतं. त्यांचा संसार अगदी छान चालला होता. प्रितमचं एक मोठं दुकान होतं. दोघे ही घर सांभाळता सांभाळता दुकानही सांभाळू लागली. देवाच्या कृपने त्यांच दुकान ही चांगल्या प्रकारे चालत होतं. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन मुले होती. असं त्यांचं पाच जणांच कुटुंब होतं. मुलांची नाव होती निखिल आणि विलास व मुलीचा नाव होतं मनीषा.
निखिल हा सर्वात मोठा मुलगा. त्याचं शिक्षण पूर्ण झालं असल्याने तो मुंबईला कामाला असायचा. कारण त्याच्यावर ही त्याच्या दोन भावडांची जबाबदारी होती. अधून-मधून तो घरी येत जात असे. व विलास आणि मनीषा ही दोघे शाळेत शिकत होती.विलास दहावीत शिकत होता तर मनीषा ही आठवीत होती. बघायला गेलं तर आई-वडिलांसाठी सगळी मुले सारखी असतात. पण विलास आणि मनीषा ही दोघे आईची जास्त लाडकी होती, व निखिल हा वडिलांचा लाडका होता.
आता हळूहळू घरात निखिलच्या लग्नाची घरात चर्चा होऊ लागली. नुपूरने व प्रितमने ह्या विषयावर निखिलशी बोलायचं ठरवलं.प्रितम म्हणाला कि तुझ्या मनात कोणी असेल तर सांग लवकरचं लग्नाचा विचार करू.पण निखिलच्या मनात तसं काही नसल्याने प्रितम व नुपूरने स्थळ शोधायचं ठरवलं. स्थळ तर येत होती पण निखिल ला हवी तशी नव्हती. थोड्या दिवसांनी निखिलला एक पोरगी पसंत पडली. त्यांचं लग्न थाटामाटात करण्यात आलं. त्यांची भावकी मोठी असल्याने लग्नाला सर्वजण आली होती.निखिलच्या बायकोचं नाव होतं प्रिया. प्रिया ही घरची सगळी काम व्यवस्थित करायची. आता निखिलने मुंबईला जायचा विचार केला पण आता त्याच लग्न झालं होतं.तो आता एकटा नव्हता. निखिलने आई-पप्पांना मुंबईला जायचं सांगितलं. ते बोलले कि आता प्रियाला ही तुझ्यासोबत घेऊन जा. कारण प्रिया ही मुंबईलाच कंपनीमध्ये कामाला जात असल्याने ती तिच्या काकांनजवळ राहत होती. तिने ही निखिलसोबत मुंबईला जायचा विचार केला. आता दोघेही मुंबईला कामाला जायचे. त्यांचा संसार ही छान चालला होता. निखिल व प्रिया अधून-मधून गावी येत असत. हळूहळू नुपूर प्रियाचा राग राग करायला लागली. प्रिया तरी तिच्याशी प्रेमानेच वागायची. पण आता प्रियाला ते सहन होईना ती ह्या विषयावर निखिलसोबत बोलली. पण निखिलने प्रियाची समजूत घातली. शेवटी प्रिया रडायलाच लागली ती बोलली कि मी आता गावी नाही येणार.निखिल पण कंटाळून बोलला हा ठीक आहे. प्रितमला हे सर्व निखिलकडून समजलं होतं. प्रितम पण नुपूरच्या अश्या वागण्याला कंटाळला होता. तो शेवटी बोलला तुम्ही मुंबईलाच रहा. सुखाने संसार करा.पण शेवटी निखिलला कसं तरी वाटू लागलं.तो हो बोलला व आज रात्रीच्या रेल्वेगाडीनी ते जायला निघाले.
आता विलासचं ही वय वाढत चाललं होतं. पण विलासच निखिलसारखं नव्हतं. त्याला श्रेया नावाची एक मुलगी आवडत होती. ह्या विषयावर तो आईसोबत बोलला होता. थोडे दिवसांनी हे दोघे हा विषय प्रितमला बोलणारच होते.कारण आता विलास ही आता सुट्टी असल्यावर दुकान सांभाळायची जबाबदारी घेत होता व तो बाकी दिवशी कामाला जायचा. मनीषाचं पण आता कॉलेज करता करता कामाला जायची. तिला पुढे शिक्षिका व्हायचं होतं.नुपूरने प्रितमसमोर विलासच्या लग्नाचा विषय काढला त्याला एक मुलगी आवडते असं सांगू लागली. प्रितमने तिची सगळी माहिती विचारली. व आता लग्नाची बोलणी करायचं ठरलं. पुढच्या महिन्यातच विलासचं व श्रेयाचं लग्न लावून देण्यात आलं. निखिल व प्रियाला ही बोलवण्यात आलं. आता दोन्ही भावांची लग्न झाली.आता फक्त मनीषा राहिली होती. चार-पाच दिवसांनी निखिल व प्रिया मुंबई ला जायला निघाले. विलास व श्रेया थोडे दिवसांनी आई-पप्पांना आराम मिळावा म्हणून त्यांनी दुकानाची जबाबदारी घेतली.दुकान आधीपेक्षा खूप चांगलं चालू लागलं त्यामुळे सर्वजण खूप खुश होते.मनीषा ही शिक्षिका झाली होती. ती शिक्षिका झाली पाहिजे यासाठी तिच्या आईने ही खूप मदत केली.आता सर्व कसं व्यवस्थित चाललं होतं.
एकदा अचानक प्रितमची तब्बेत खालावली. घरातल्या सर्वांनी त्याला लगेच दवाखान्यात नेलं.विलासने ह्या बद्दल निखिलला कळवलं. परंतु निखिल यायच्या आधीच प्रितम मरण पावला.प्रितमवर अंत्य संस्कार करण्यासाठी त्याला घरी नेलं.निखिल मोठा मुलगा असल्याने त्याला गावी यायलाच लागणार होतं. त्यांच्या भावकीतील सर्वांना त्याला खूप विनवण्या केल्या तुझ्या वडिलांची तब्बेतच खूपच खराब झाली आहे असं म्हणून त्यांनी त्याला व प्रियाला गावी यायलाच लावलं. घरी येताच त्याने सर्वांना हाका मारायला सुरुवात केली. पण सर्वजण जमली असल्याने त्याला काही सुचेना. तो आईजवळ गेला बघतो तर काय आपले वडील या जगात राहिले नाही हे कळताच तो जोरात रडू लागला.आता तो पूर्णच कोसळून गेला होता.आता थोड्याच वेळात प्रितमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.आता त्यांच घर एकदम शांत शांत वाटू लागलं होतं.आता आपले वडील नाहीत आईची काळजी आपल्याचं घ्यावी लागणार हे आता सर्वांना कळू लागलं होतं.नुपूरच्या मनातून प्रितमचा विचारच जात नव्हता.आपला नवरा आपल्याला अचानक सोडून गेला याच दुःख तिला काही केल्या सहन होईना.दिवस जरी संपत असले तरी आठवणी ह्या येतच होत्या. निखिल मोठा मुलगा असल्याने त्याने विलास व मनीषाला आईला मुंबईला नेण्याचं विचारलं. त्या निमित्ताने का होईना नुपूर त्यांच्यात गुंतून राहील.पण नुपूरने मुंबईला यायला नकार दिला. ह्यावरून विलास निखिलला बोलला दादा वहिनी तुम्ही मुंबईला जा मी आणि श्रेया आईची आणि मनीषाची काळजी घेऊ.आईने ही त्यांना मुंबईला जायला सांगितलं. आता विलासला आपल्या बहिणीची काळजी वाटू लागली. त्याने निखिलला मनीषाच्या लग्नाबद्दल विचारलं. तो बोलला कि एक-दोन वर्षांनी तीच लग्न करूया. ह्या विषयावर ते आईसोबत बोलले.आता एक-दोन वर्षांनी मनीषाचं ही लग्न लावून देण्यात आलं. हळू-हळू श्रेया नुपूरला सांभाळायला कंटाळू लागली. विलास श्रेयाचं सगळंच ऐकायचा. त्याने तीला हवं म्हणून दुकान घर आपल्या ताब्यात घेतलं. शेवटी वडील नसल्याने विलास ही बदलला. त्याला आईचा कधी धाकच नव्हता. त्या दोघांनी मिळून आईला घराबाहेर काढलं. जर आधीच नुपूरने प्रियाला व्यवस्थित समजून घेतलं असतं तर आज तिच्यावर ही वेळच आली नसती. शेवटी नशिबात असतं ते घडणारचं. हा सगळा विषय निखिलपर्यंत पोचला. त्याला हे काही सहन झालं नाही. तो तातडीने गावी आला व ह्या विषयावरून भावाशी बोलू लागला. बोलणं तर सोडाच ह्या विषयावरून त्यांच्यात खूप मोठी भांडणं झाली. मनीषा ही आईला भेटायला येईना. ती पण विलाससारखी बदलून गेली.निखिलने आईला मुंबईला न्यायचं ठरवलं परंतु ती थोडे दिवसांनी गावी आली. तिने प्रियाला दिलेला त्रास तिला आठवू लागला. तिला स्वतःची चुक कळू लागली. गावी आल्यावर तिला राहायला घर ही नव्हतं ती आपल्या भावकीतील कोणाकोणाकडे थोडे-थोडे दिवस राहू लागली. आता सर्वजणच तिला कंटाळू लागली. सर्वांनी मिळून हा विषय विलासला घेऊन बोलूया ठरवलं.त्यांनी विलासला बोलवून नुपूरला सांभाळायचं सांगितलं पण तरी तो त्यांना दुसरं घर बांधून देतो असं सांगू लागला. व तिला जेवण पण देऊ असं सांगू लागला. हे ऐकून त्यांनी हा विषय तिथे थांबवला. थोड्या दिवसांनी नुपूरला एक छोटं घर बांधून दिलं. ती त्याच्यात राहू लागली अधून-मधून निखिल तिला फोन करायचा. विलास च्या लग्नाला आता चार-पाच वर्ष झाली होती त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी मुलं होती. नुपूरला वेळेवर जेवण सुद्धा कधी मिळायचं नाही. नुपूरकडे तिच्या सोन्या-नाण्याची पिशवी होती. ती पण विलास व श्रेयाने पळवली. ती मात्र वाट बघायची. तिचा हा त्रास स्वतःला बघवत नव्हता. एकदा त्यांच्या भावकीतील एक मुलगी त्याच वाटेने जात होती. ती काकी म्हणजे नुपूरने तिला हाक मारली. ती तिच्याकडे गेली तिने तिला भूक लागली असं सांगितली त्या मुलीने तिला दुकानातून काही तरी खायला आणून दिलं. नुपूरच्या डोळ्यात चटकन अश्रू आले. ती ढसाढसा रडूच लागली. पण त्या मुलीने तिला शांत केलं. व ती आपल्या घरी गेली. ती मुलगी मध्ये-मध्ये त्याच वाटेने दुकानात जायची. तेव्हा नुपूरची व तिची भेट व्हायची. हळू-हळू नुपूरची ही तब्बेत बिघडत चालली. श्रेया मुद्दाम जेवणात तिला न आवडणार जिरं वैगेरे घालून द्यायची. नाश्ता एक-दोन वाजता आणून द्यायची. त्यामुळे आता नुपूरची भूक मेली होती. तिचं खाणं ही कमी कमी झालं होतं. आधी पेक्षा ती एकदम बारीक झाली. विलास दत्तमंदिर मध्ये जाऊन देवाची कधी कधी भक्ती करायचा. पण घरातल्या आईला कधी सांभाळलं नाही तर देवळातला देव तरी त्याला कसा पावेल? त्याला हे समजतच नव्हतं. ती मुलगी नुपूरला कधी तरी काहीतरी बनवलेलं खायला घेऊन जायची. व येताना तिचा आशीर्वाद घेऊन यायची. बरं नसलं कि ती आपल्या नातवाला डॉक्टरकडे न्यायला सांगायची पण नातू ही तिचं काही ऐकायला तयार नव्हता.तिला मध्ये शिरवाळे खावेशे वाटले होते. ती त्या मुलीला त्याबद्दल विचारू लागली. पण ती मुलगी आईला बोलली. तीन-चार दिवसांनी ती मुलगी पुन्हा तिच्याकडे भेटायला गेली पण नुपूरला तेव्हा उठायला ही जमत नव्हतं. त्या मुलीने तिला हाक मारली व घरी जायला निघाली. ती एकटी मुलगी तिला दवाखान्यात तरी नेणार कशी? कारण तिला मदत करणार कोणीच नव्हतं. त्यामुळे ती घरी गेली. आईला ह्या बद्दल तिने सांगितलं होतं. त्या मुलीच्या आईने दोन दिवसांनी शिरवाळे करायचं ठरवलं पण नेमकं त्याच दिवशी नुपूरने शेवटचा श्वास घेतला. नुपूरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.ही बातमी त्या मुलीला समजली त्या मुलीला खूप वाईट वाटलं.शेवटी आजची तिची भेट अपूर्णचं राहिली. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आईला समजणं वेगळंच आहे नाही का? तेव्हाच जर विलास माझी आई आहे असं ठणकावून श्रेयाला बोलला असता तर आज नुपूरही ह्या जगात असती. तरुण कोणीच राहत नाही सर्व म्हातारी होतातच. समजा उद्या जर विलास व श्रेयावर अशी वेळ आली तर समजेल का त्यांना? पण तेव्हा समजून उपयोग नसेल आधीच हिरा गमावला असेल नाही का? विलास व श्रेयाला ही त्यांच्या मुलाने घराबाहेर काढलं व बोलले ज्या घरात तुम्ही आजीला ठेवलं तेच घर आता तुमच्यासाठी. तेव्हा खरंच त्यांना समजेल. पण आता त्यांना समजून काहीच नाही. पण शेवटी प्रत्येकालाच कर्माचं फळ मिळतं. पैसे हातात येत राहिल्यावर एवढं ही माणसाने लालची होऊ नये. पैसा आज ना उद्या येईलच. परंतु गेलेली वेळ व गेलेली माणसं मिळवणं खूप कठीण.
- नेहा उत्तम राणे.