लाकूडतोड्या
एकदा एका लाकूडतोड्याची बायको विहिरीत पडली. त्याला पोहता येत नव्हतं, पण त्याच वेळेला त्याला एक अशीच जुनी घटना आठवली. त्यानं विहिरीच्या काठावर बसून परमेश्वराचा धावा सुरू केला. हा धावा अंत:करणापासून आहे, हे त्या दयाघनाने जाणलं. ज्ञानेश्वरीच्या भांडवलावर प्रवचनांचा धंदा करणाऱ्या पंडित-पुरोहितांची ती हाक नव्हती. तो धावून आला. त्याने विहिरीत उडी मारली. परकीयांच्या भांडवलावर चालणाऱ्या चित्रपटसृष्टीतल्या माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या एका देखण्या बाईला घेऊन तो काठावर आला. अस्सल मोत्यांच्या दागिन्यांनी ती लगडलेली होती. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणाला, ‘‘भगवंता, ही माझी पत्नी नाही.’’ परमेश्वराने पुन्हा बुडी मारली आणि तो काठावर आला. ह्या वेळेला तर डिम्पलला मागे सारील अशी युवती. सुवर्णालंकारांच्या भाराने वाकलेली. पुन्हा हात जोडीत लाकूडतोड्या म्हणाला, ‘‘का भक्ताची मस्करी करता?’’ परमेश्वराने तिसऱ्यांदा सूर मारला. ह्या वेळेला काजोलसारखी यौवना आणि अंगावर नजर दिपून जाईल असे हिऱ्याचे अलंकार. लाकूडतोड्या पुन्हा काकुळतीला आला. मग भगवंताला त्याच्या निर्लोभी मनाची करुणा आली आणि लाकूडतोड्याच्या खऱ्याखुऱ्या अर्धांगीसह तो वर आला. पहिल्या तिघी विहिरीच्या काठावरच बसल्या होत्या. लाकूडतोड्याने स्वत:च्या पत्नीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, ‘‘भगवंता, तुम्हाला खूप कष्ट दिले; पण हीसुद्धा माझी पत्नी नाही.’’ जगदीश्वराला धक्काच बसला. ‘‘असं कसं म्हणतोस? मीच तुमची जन्मगाठ घालून दिली होती.’’ ‘‘होय दयाघना. तरी मी हिचा स्वीकार करीत नाही, कारण...’’ ‘‘बोल!’’ ‘‘मागे एकदा आपण अशीच एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड विहिरीतून काढून दिली होतीत. ते माझे पणजोबा. त्यांना तुम्ही सद्वर्तनाबद्दल तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्यात. तसं पुन्हा केलंत तर? एका पत्नीचं पोट भरताना नाकात दम आलाय. आता जंगलतोड थांबवायची, असं वर्षानुवर्षं म्हणताहेत. पण हॉटेल्स बांधणारे बिल्डर्स सुटतात. वनरक्षक वनभक्षक झालेत. मी नेमका सापडलो तर चार बायकांना कसं सांभाळू?’’ ‘‘अरे वेड्या भाबड्या, त्या तिघींच्या अंगावरचे दागिने पाहिलेस तर तुला दोन पिढ्यांचा प्रश्न सोडवता येईल.’’ लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘‘माझ्या पणजोबांच्या काळात इन्कमटॅक्सवाले नसावेत. कायद्याचं राज्य होतं. तुम्हीही गुप्त व्हा. तुमच्याजवळ रत्नजडित मुकुटापासून सगळं आहे.